आदिनाथ साखर कारखाना संजयमामांच्या नेतृत्वात पुन्हा ऊभारी घेईल याची विरोधकांना भिती, सभासदांचा मात्र संजयमामांच्या नेतृत्वावर विश्वास- ॲड. अजित विघ्ने.
करमाळा प्रतिनिधी.
करमाळा तालुक्यातील सहकाराचे मंदीर असणारा आदिनाथ सहकारी साखर कारखाना सहकारी तत्वावर चालावा व रसातळाला गेलेल्या आदिनाथ कारखान्याने पुन्हा गतवैभव प्राप्त करावे ही सर्व सामान्य सभासंदाची ईच्छा असुन, सभासदांच्या इच्छेनुसारच आदिनाथचे सभासद असणाऱ्या संजयमामा शिंदे यांनी या निवडणुकीत स्वतः नेतृत्व करीत उडी घेतली आहे. वास्तविक माजी आमदार संजयमामा शिंदे यांना साखर उद्योगधंद्यातील १७ वर्षाचा अनुभव असुन, या अनुभवाच्या जोरावर तसेच त्यांचे पाठीशी असणारे महाराष्ट्र सरकारचे पाठबळ, स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेला शब्द,तसेच बारामती ॲग्रोचे सर्व्हेसर्वा व कर्जत-जामखेडचे आमदार रोहीतदादा पवार यांचा प्रत्यक्ष पाठींबा या सर्व जमेच्या बाबी विचारात घेता आदिनाथला वाचविण्यासाठी शेवटची संधी म्हणुन प्रत्येक सभासद आणि कामगार या निवडणुकीकडे पहातो आहे.
आजपर्यंत या कारखान्यावर ज्यांची सत्ता आली ती कधीच एकमुखी व एक विचाराची नव्हती त्यामुळे गलिच्छ राजकारणाच्या खेळात आदिनाथचे वाट्टोळे झाले आहे.आज आदिनाथवर जवळपास २६४ कोटींचे कर्ज असुन व्यापारी, कामगारांची देणी थकीत आहेत. अशा आव्हानात्मक परिस्थितीतुन भांडवलाची स्वतः ऊभारणी करून पर्यायाने महराष्ट्र शासनाचे सहकार्य घेऊन आणि विविध बँकाच्या दाखल कायदेशीर प्रक्रियेतुन मार्ग काढुन या कारखान्याला पुन्हा ऊभारी द्यायची हे नक्कीच कठीण आहे. यासाठीच माजी आमदार संजयमामांचे एकमेव नेतृत्व या करीता सभासदांना सक्षम वाटते. एकीकडे मामांची कारखाना चालविण्यासाठीची तळमळ ते बोलून दाखवित आहेत तर दुसरीकडे मामांच्या नेतृत्वात कारखाना जाऊ नये म्हणुन काही जणांची चाललेली वळवळ दिसून येत असुन,विरोधक खालच्या पातळीवर जाऊन टिका टिप्पणी करीत आहेत. मामांनी त्यांचा खाजगी कारखाना धंद्यातले फायदे तोटे तपासुन कंपनी कायदयानुसार ओंकारेश्वर शुगर्स कंपनीमधे मर्ज केला आहे. विशेषतः या कंपनीचे इक्वीटी शेअर्स मामांचे आहेत.परंतु विरोधक विपर्यास करताना दिसत आहे.
खरं तर आदिनाथ करिता आघाडी करणारातच निवडणुकी आधीच बिघाडी झालेली आहे. त्यामुळे नेतेमंडळींची वक्तव्ये दिवसेंदिवस बदलत आहेत.ज्येष्ठ नेते मंडळींच्या या कोलांटउड्याने शेतकरी सभासदांचे मनोरंजन होत आहे.पाचकळ विनोद आणि असभ्य भाषेमुळे विरोधकांची सभा म्हणजे तमाशाचाच फड असल्याचा भास मतदारांना होत आहे.ज्या मोहीते पाटलांचे आदेशाने ही आघाडी झाली त्या मोहीते पाटलांनी त्यांचे कारखाने व्यवस्थित चालवले का?. त्यांच्या अनेक सहकारी संस्था बंद आवस्थेत का आहेत?.जिल्हा मध्यवर्ती बँकेचे वाटोळे कशामुळे झाले? आदिनाथ कारखान्यांमधून सोन्याचा धूर का निघाला नाही ? असे प्रश्न आता सभासद विचारत आहेत.पाटील गटाचे प्रवक्ते तळेकरांना प्रत्येक गोष्ट टाइमपासची वाटते यामध्ये त्यांचा काहीच दोष नाही, कारण त्यांच्या सभांमध्ये विनोद ,टाइमपास याशिवाय दुसरे काहीच नसते.
माजी आमदार संजयमामांवर टिका टिप्पणी करण्यातच विरोधक धन्यता मानत आहेत . त्यांनी कारखाना कसा चालू करणार ? त्या करीता निधीची उभारणी कशी करणार ? अर्थसहाय्य कोण करणार ? सभासदांना अधिक दर मिळावा यासाठी काय उपाययोजना करणार ? हे आजपर्यंत एकाही भाषणात जाहीर केलेले नाही.विरोधी आघाडीत उमेदवार असलेल्या लोकांनीच आजपर्यंत सर्व सामान्य सभासदांना वेगवेगळया माध्यमातुन किती त्रास दिला आहे हे सभासद स्पष्टपणे सांगत आहेत. सर्व पर्याय संपल्यामुळेच माजी आमदार संजयमामांचे नेतृत्वाला जनाधार मिळत आहे. बरेच लोक विधानसभेची झालेली चूक सुधारून मामांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहात आहेत. त्यामुळे आदिनाथ साखर कारखान्यावर परिवर्तन अटळ आहे असे मत शिंदे गटाचे प्रवक्ते ॲड. अजित विघ्ने यांनी मांडले आहे.
