करमाळा तालुक्यातील राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनीची गरूडझेप सोलापूर जिल्ह्याचा नवा आदर्श ठरणार – जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले
करमाळा (प्रतिनिधी):
केंद्र सरकारच्या दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याच्या धोरणांतर्गत करमाळा तालुक्यात स्थापन झालेली राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनी अल्पावधीतच उल्लेखनीय प्रगती करत असून, ही करमाळा तालुक्यातील कंपनीची गरूडझेप भविष्यात सोलापूर जिल्ह्यासाठी आदर्श ठरणार असल्याचा विश्वास जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले यांनी व्यक्त केला.
कंपनीच्या विस्तारित नवीन युनिटच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सह्याद्रीच्या धर्तीवर काम करत ही कंपनी शेतकऱ्यांना एकत्र आणून सक्षम बाजारपेठ निर्माण करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी ही चळवळ अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर तहसीलदार शिल्पा ठोकडे, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र नेटके, डीडीएम नितीन शेळके, वॉटरशेड ट्रस्टचे कांतीलाल गीते, जिल्हा परिषद सदस्य गणेश चिवटे, पंचायत समिती सभापती पूजा ढेरे, सदस्य भरत अवताडे, विवेक येवले, सुजित बागल, अजयकुमार बागल, डॉ. अमोल गोफणे, लता तिटके, शोभा अंधळकर, दिनेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
भोसले पुढे म्हणाले की, “महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. रोजगार हमी योजना, ठिबक सिंचन, फळबाग अनुदान, अवजार बँक यांसारख्या योजनांमुळे शेती अधिक सक्षम होत आहे. मात्र, शाश्वत प्रगतीसाठी शेतकऱ्यांनी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून एकत्र येणे आवश्यक आहे.”
ते पुढे म्हणाले की, “पारंपरिक सहकार व्यवस्थेचे आधुनिक रूप म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी होय. शासन आणि शेतकरी यांच्यातील दुवा म्हणून या कंपन्या भविष्यात अधिक प्रभावी ठरणार आहेत. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने या चळवळीत सहभागी होणे गरजेचे आहे.”
वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टचे कांतीलाल गीते यांनी सांगितले की, शासन अनुदान तसेच विविध संस्थांच्या सहकार्याने मिळालेल्या निधीचा योग्य वापर केल्यामुळे कंपनीने अल्पावधीतच सक्षम पायाभरणी केली आहे.
यावेळी डीडीएम नितीन शेळके, तहसीलदार शिल्पा ठोकडे, सभापती पूजा ढेरे, सदस्य भरत अवताडे तसेच आयसीएल, जय किसान आणि आर्या शक्ती या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी शेती, माती परीक्षण आणि खत व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कंपनीचे अध्यक्ष डॉ. विकास वीर यांनी केले. सूत्रसंचालन अरुण चौगुले यांनी केले, तर आभार प्रा. बिभीषण मस्कर यांनी मानले.
चौकट:
बेंद फाटा येथे अत्याधुनिक शेतकरी सुविधा सुरू
राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनीतर्फे बेंद फाटा येथे शेतकऱ्यांसाठी विविध आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये ऍग्रो मॉल, टिश्यू कल्चर केळी व डाळिंब रोपे, ठिबक सिंचन साहित्य, पीव्हीसी पाइप, रासायनिक खते व औषधे, जैविक निविष्ठा निर्मिती व विक्री, विषमुक्त धान्य खरेदी-विक्री, कोल्ड स्टोरेज, ६० टन क्षमतेचा वजन काटा, गांडूळ खत युनिट, फवारणी ड्रोन, पॉवर टिलर, विडर, ग्रास कटर, एचटीपी पंप, वेदर स्टेशन आदींचा समावेश आहे.
या सुविधांमुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेती अधिक आधुनिक, तंत्रज्ञानाधारित आणि फायदेशीर करण्यासाठी मोठी मदत होणार आहे.


