Wednesday, April 29, 2026
Latest:
Uncategorized

सुनेत्रा वहिनींनी विधान परिषदेची उमेदवारी संजयमामांना द्यावी : विवेक येवले

करमाळा(प्रतिनिधी) – येणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत सुनेत्रा वहिनींनी सोलापूर जिल्ह्याचे नेते,स्व.अजितदादांचे सदैव निष्ठावंत समर्थक असलेले माजी आमदार संजयमामा शिंदे यांनाच उमेदवारी द्यावी आणि त्यांना उमेदवारी देऊन जिल्ह्यातील अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करणे हे पक्षहिताच्या दृष्टीने गरजेचे असल्याचे प्रतिपादन मकाईचे संस्थापक – संचालक,मराठा महासंघाचे उपाध्यक्ष,संजयमामांचे खंदे समर्थक विवेक येवले यांनी केले आहे.
या विषयी बोलताना येवले म्हणाले,आपण ही मागणी सोलापूर जिल्ह्यातील सगळ्या मामासमर्थक कार्यकर्त्यांच्या वतीने करत आहोत.गेल्या काही वर्षांमध्ये जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मामांनी आपल्या व्हिजनशील नेतृत्वाचा करिष्मा तर सिद्ध केलाच आहे पण हे करत असताना त्यांनी पवार, विशेषतः अजितदादांच्या नेतृत्वाची बांधिलकी सदैव जपली हे लक्षात घेणं गरजेचं आहे.राष्ट्रवादी एकत्र असताना २०१९ ला माढा मतदारसंघात साहेबांनी अचानक लादलेली उमेदवारी स्वीकारून पराभव पत्करावा लागला तरीदेखील नेतृत्वनिष्ठा कधीच सोडली नाही हेही लक्षात घेणं गरजेचं आहे.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीबद्दल ज्यांचे नाव चर्चेत आहे त्यांनी गत विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध जाहीर भूमिका घेऊन त्या उमेदवाराला पराभूत करायला हातभार लावला, नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत जे दोन्ही पाटील बंधू वेगवेगळ्या पक्षातून उभे राहून उताणे पडले,ज्यांना पुन्हा दादांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केलं,ज्यांचे पुढारपण हे केवळ मीडियाच्या व नौटंकीच्या जीवावर अवलंबून आहे,त्यांची नावं चर्चेत येणं ही बाब नक्कीच दुर्दैवी आहे असं म्हणावं लागेल.
अशा हिरो कम झिरो असलेल्या पाटलाला जर पक्ष नेतृत्वाने संधी दिलीच तर दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढील काळात सोलापूर जिल्ह्यात उच्चाटन होईल हे नक्की.संजयमामा २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले पण आज करमाळा मतदारसंघातील जनतेला त्याचा पश्चात्ताप होतोय हे वास्तव आहे,कारण मामांना पराभूत केल्यामुळे या मतदारसंघाचा विकास कसा खुंटला आहे याची जाणीव जनतेला झालेली आहे.त्यामुळं मामांना विधानपरिषदेच्या माध्यमातून संधी देऊन या मतदारसंघाच्या,जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती द्यावी अशी सार्वत्रिक अपेक्षा व्यक्त होत असून २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातली जनता मामांना डोक्यावर घेऊन, बँड लावून प्रचंड मतांनी आमदार म्हणून विजयी करेल हे चित्र आता स्पष्ट झालेले आहे.सध्या मात्र करमाळा मतदारसंघाच्या खुंटलेल्या विकासाला गती देण्यासाठी आणि जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस व अजितदादांची विचारधारा रुजविण्यासाठी मामांनाच पक्षनेतृत्वाने संधी देणं आवश्यक असल्याचे प्रतिपादन यावेळी बोलताना येवले यांनी केले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!