केत्तुर (पारेवाडी) स्थानकावर हरंगुळ व कलबुर्गी गाड्या नियमित प्रवासामध्ये समाधान; चेन्नई–मुंबई एक्सप्रेस थांबविण्याची मागणी कायम-ॲड अजित विघ्ने
करमाळा प्रतिनिधी
मध्य रेल्वेच्या केत्तुर (पारेवाडी) रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या दीर्घकालीन मागणीनुसार हरंगुळ (लातूर) व कलबुर्गी या गाड्यांना अखेर नियमित थांबा देण्यात आला आहे. या निर्णयामुळे परिसरातील प्रवाशांची मोठी सोय झाली असून प्रवास अधिक स्वस्त व सुलभ झाला आहे. मात्र, पुणे–मुंबईकडे जाणाऱ्या चेन्नई–मुंबई एक्सप्रेसला देखील येथे थांबा द्यावा, अशी आग्रही मागणी नागरिकांकडून होत आहे.
या स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा यासाठी स्थानिक नागरिक व प्रवाशांनी यापूर्वी एल्गार मोर्चाही काढला होता. त्यानंतर तत्कालीन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी याची दखल घेत हरंगुळ व कलबुर्गी गाड्यांना तात्पुरता थांबा मिळवून दिला होता. तसेच चेन्नई–मुंबई एक्सप्रेसच्या थांब्याबाबतही त्यांनी आश्वासन दिले होते.
सदर दोन्ही गाड्या सुरुवातीला तात्पुरत्या स्वरूपात धावत होत्या. मात्र, प्रवाशांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आता त्या नियमित करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांच्या तिकीटदरातही मोठी घट झाली असून पूर्वी ७०० ते ८०० रुपयांपर्यंत असणारा खर्च आता २०० ते ३०० रुपयांपर्यंत कमी झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
करमाळा पंचायत समितीचे उपसभापती ॲड. अजित विघ्ने यांनी रेल्वे प्रशासनाचे आभार मानत हा निर्णय स्वागतार्ह असल्याचे सांगितले. तसेच आगामी काळात केत्तुर स्थानकावर चेन्नई–मुंबई मेल/एक्सप्रेसला थांबा मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.


