स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी स्व. रुक्मिणी विठ्ठल आवताडे यांच्या २७ व्या पुण्यस्मरणानिमित विशाल महाराज खोले यांचा ‘आई-वडील हेच खरे दैवत’चा हृदयस्पर्शी संदेश
करमाळा प्रतिनिधी :
राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य भरत (भाऊ) आवताडे यांच्या मातोश्री स्व. रुक्मिणी विठ्ठल आवताडे यांच्या २७ व्या पुण्यस्मरणानिमित्त भरत भाऊ आवताडे यांच्या फार्म हाऊसवर आयोजित करण्यात आलेल्या ह.भ.प. विशाल महाराज खोले यांच्या भावपूर्ण कीर्तनाने परिसर भक्तिमय आणि भावनिक वातावरणात न्हाऊन निघाला. ‘आई’ या विषयावर आधारित निरूपणातून महाराजांनी मातृप्रेम, त्याग, संस्कार आणि आई-वडिलांचे जीवनातील अनन्यसाधारण स्थान अत्यंत प्रभावी शब्दांत उलगडून सांगितले. त्यांच्या ओघवत्या वाणीने आणि भावस्पर्शी उदाहरणांनी अनेक भाविकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
गेल्या सलग २७ वर्षांपासून स्व. रुक्मिणी विठ्ठल आवताडे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त भरत भाऊ आवताडे परिवाराच्या वतीने कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असून, ही सामाजिक व धार्मिक परंपरा आजही अखंड श्रद्धा, भक्तिभाव आणि सेवाभावाने जोपासली जात आहे. या उपक्रमातून मातृ-पितृभक्ती, अध्यात्म, संस्कार आणि समाजप्रबोधनाचा संदेश सातत्याने दिला जात असून, दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक या कार्यक्रमाला उपस्थित राहतात.
कीर्तनात बोलताना ह.भ.प. विशाल महाराज खोले म्हणाले, “आई असते तेव्हा तिचे मोल अनेकदा जाणवत नाही; पण ती कायमची निघून गेल्यानंतर तिच्या मायेची उब, तिचे प्रेम, तिचा हात आणि तिच्या आशीर्वादाचे महत्त्व प्रत्येक क्षणी जाणवत राहते.” यावेळी त्यांनी संतवचनाचा उल्लेख करत “स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी” या ओळीचा संदर्भ देत आईचे स्थान जगातील कोणतीही व्यक्ती, वैभव किंवा संपत्ती भरून काढू शकत नाही, असे भावपूर्ण प्रतिपादन केले.
पुढे मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, “जीवनात आई-वडील हेच खरे दैवत आहेत. त्यांची मनापासून सेवा करा, त्यांचा सन्मान करा. त्यांच्या आशीर्वादातच देवाचे दर्शन आहे. ज्यांना आई-वडिलांची सेवा करण्याचे भाग्य लाभते, त्यांनाच खऱ्या अर्थाने देवाची कृपा, सुख, समाधान आणि यश प्राप्त होते. आई-वडिलांची सेवा हीच सर्वश्रेष्ठ ईश्वरसेवा आहे.” या विचारांनी उपस्थित भाविक अंतर्मुख झाले.
या कार्यक्रमास माजी आमदार जयवंतराव जगताप, भाजप युवा नेते दिग्विजय बागल, युवा नेते यशवंत भैय्या शिंदे, पंचायत समिती सभापती प्रतिनिधी दिलीप ढेरे, पंचायत समिती उपसभापती ॲड. अजित विघ्ने, पोलीस निरीक्षक रणजीत माने नगरसेवक महादेव आण्णा फंड, मनसे जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब मोरे, पंचायत समिती सदस्य नानासाहेब झाकणे, जिल्हा परिषद सदस्य दशरथशेठ घाडगे, जिल्हा परिषद सदस्य अजित तळेकर, शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे बाबुराव जगदाळे सर, नानासाहेब नीळ, सुभाष हानपुडे, गणेश सरडे, मकाईचे संचालक सतीश नीळ, शेखर गाडे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजिंक्य पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुजीत तात्या बागल, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सचिन काळे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन खटके, अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष पत्रकार दिनेश मडके,काय सांगताचे संपादक पत्रकार अशोक मुरूमकर, राष्ट्रवादी काँग्रेसजिल्हा उपाध्यक्ष आशपाक जमादार, अभिषेक आव्हाड यांच्यासह शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. रुक्मिणी विठ्ठल आवताडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ह.भ.प. विशाल महाराज खोले यांच्या रसाळ आणि प्रबोधनात्मक कीर्तनाने उपस्थितांना मातृप्रेम, संस्कार आणि आई-वडिलांच्या सेवेचे महत्त्व नव्याने जाणवून दिले. कीर्तनानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना माजी आमदार जयवंतराव जगताप म्हणाले, “भरत भाऊ आवताडे यांची मातृ-पितृभक्ती निश्चितच कौतुकास्पद असून, त्यातून भावी पिढीने प्रेरणा घेण्याची आवश्यकता आहे. देवधर्म करण्याबरोबरच आई-वडिलांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे. प्रत्येकाने आपल्या जीवनात परमेश्वराप्रती निष्ठा, श्रद्धा आणि भक्तीभाव ठेवून जीवन जगावे. परमेश्वरावर दृढ विश्वास ठेवला, तर सुख, समृद्धी आणि आनंद निश्चितच लाभतो. त्यामुळे प्रत्येकाने देवभक्तीबरोबरच मातृ-पितृसेवेलाही आपल्या जीवनाचे सर्वोच्च कर्तव्य मानावे.” तसेच गेल्या २७ वर्षांपासून स्व. रुक्मिणी विठ्ठल आवताडे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त भरत भाऊ आवताडे यांनी अखंडपणे जपलेली मातृभक्तीची परंपरा अत्यंत प्रेरणादायी असून, त्याबद्दल त्यांनी विशेष कौतुक व्यक्त केले.
भरत भाऊ आवताडे यांच्या फार्म हाऊसवर संपन्न झालेल्या या पुण्यस्मरण सोहळ्याने भक्ती, संस्कार आणि समाजप्रबोधनाचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. आईच्या मायेचा, त्यागाचा आणि आई-वडिलांच्या सेवाभावाचा गौरव करणाऱ्या या कार्यक्रमाने उपस्थितांना जीवनातील खऱ्या मूल्यांची जाणीव करून दिली. ‘मातृ-पितृसेवा हीच ईश्वरसेवा’ हा संदेश प्रत्येकाच्या मनात कायमचा कोरला गेला आणि हा सोहळा उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला आहे.


