Monday, September 21, 2026
Latest:
Uncategorized

अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाची वृत्त लेखन कार्यशाळा यशस्वी -जिल्ह्यातील पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद डॉ. अंबादास भासके आणि डॉ. बापू चंदनशिवे यांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन

करमाळा प्रतिनिधी 
“वृत्तलेखन ही एक कला असून ते फक्त माहिती देणे एवढ्यापुरते मर्यादित राहिले नाही, तर आता ते संवादाचे एक अत्यंत प्रभावी माध्यम बनले आहे,” असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अंबादास भासके यांनी केले. तर, “वृत्तलेखनामध्ये स्पष्टपणा, परखडपणा आणि लोकहिताचे प्रश्न मांडल्यास ते लेखन जनमानसात लोकप्रिय होते,” असे मत अहिल्यानगर येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या मीडिया अँड मास कम्युनिकेशन विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. बापू चंदनशिवे यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने जिल्ह्यातील सर्व पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत ‘वृत्तलेखन कार्यशाळेत’ ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
उपक्रमाची पार्श्वभूमी व प्रास्ताविक
जिल्ह्यातील पत्रकारांच्या लेखणीला आणखी धार चढावी आणि त्यांच्या वृत्तलेखनात कौशल्यपूर्ण विकास व्हावा, या उद्देशाने अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून या अनोख्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री विठ्ठल आणि आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक करताना जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी यांनी संघटनेच्या वतीने राबवण्यात येणारे आरोग्य शिबिर, विविध प्रशिक्षण कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांची माहिती देत या कार्यशाळेमागची भूमिका सविस्तरपणे विशद केली.
दिग्गजांची उपस्थिती
या प्रसंगी मंचावर अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत, राज्य तांत्रिक सल्लागार नागनाथ सुतार, सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी, जिल्हा कार्याध्यक्ष तानाजी जाधव, शहराध्यक्ष सोहन जयस्वाल, तालुकाध्यक्ष नामदेव लकडे, करमाळा तालुका अध्यक्ष दिनेश मडके, मराठी पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र कोरके, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे शहराध्यक्ष अपराजित सर्वगोड, नगरसेवक दीपक चंदनशिवे  करमाळा तालुका उपाध्यक्ष संजय साखरे, तालुका सचिव तुषार जाधव तालुका प्रवक्ता नितीन झिंजाडे राहुल रामदासी आदी मान्यवर उपस्थित होते.
अभ्यासपूर्ण मार्गदर्शन व शंका निरसन
या कार्यशाळेला सोलापूर जिल्हाभरातून पत्रकारांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दोन्ही प्रमुख मार्गदर्शकांनी वृत्तलेखनाच्या विविध पैलूंवर अत्यंत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. उपस्थित पत्रकारांनी महत्त्वाचे मुद्दे टिपून घेत आपल्या ज्ञानात भर घातली. व्याख्यानानंतर झालेल्या प्रश्नोत्तराच्या सत्रात मार्गदर्शकांनी उपस्थितांच्या सर्व शंकांचे निरसन केले.
प्रमाणपत्र वाटप व सन्मान
कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही प्रमुख मार्गदर्शकांना डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. तसेच कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व पत्रकारांना प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन संघाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रशांत माळवदे यांनी केले. पत्रकारांच्या लेखणीला कौशल्य आणि गुणवत्तेचे बळ देणाऱ्या या उपक्रमाबद्दल अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाच्या सोलापूर शाखेचे सर्व स्तरातून विशेष कौतुक होत आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!