प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना पुरी (ओडिशा) येथे ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब नरारे यांना शास्त्रीय संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल पुरी (ओडिशा) येथे प्रतिष्ठेच्या ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुरी येथील सुकुमारी कला केंद्राच्या वतीने आयोजित संगीत व नृत्य महोत्सवात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरीचे माजी आमदार जयंत कुमार सारंगी, नृत्यगुरू गोविंद चंद्र पाल, गुरू आशिष दास आणि गुरू श्रीमती मिनाती प्रधान यांच्या हस्ते श्री. नरारे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या महोत्सवात देशातील विविध राज्यांमधून आलेल्या संगीत व नृत्य क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या निवडक कलाकारांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. विविध कलाप्रकारांच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि कलापरंपरेचे दर्शन या महोत्सवात घडले.
महोत्सवामध्ये भारतातून आलेल्या कलाकारांनी शास्त्रीय गायनासह ओडिसी, कथक, सत्रिय, मोहिनीअट्टम, रवींद्र नृत्य, झुमर आदी विविध नृत्यशैलींचे बहारदार सादरीकरण करण्यात आले.
शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने कार्यरत असलेल्या प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना राष्ट्रीय स्तरावरील महोत्सवात मिळालेला हा सन्मान करमाळा शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरला आहे.


