करमाळा

दत्तकला ग्रुप ऑफ स्कूलमध्ये उन्हाळी शिबिराचे उत्साहात उद्घाटन संपन्न

करमाळा प्रतिनिधी 
स्वामी चिंचोली व केतूर येथील दत्तकला ग्रुप ऑफ स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या उन्हाळी शिबिराचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी संस्थेच्या सचिव सौ. माया झोळ, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर, स्कूल डायरेक्टर सौ. नंदा ताटे, सीबीएसई शाळेच्या प्राचार्या सौ. वृषाली बागुल, एसएससी शाळेच्या प्राचार्या सौ. सिंधू यादव, केतूर शाळेचे प्राचार्य श्री. मरकड, सौ. संगीता खाडे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान सचिव सौ. माया झोळ यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत Brain Gym, स्वसंरक्षण आणि अध्यात्म यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धीबरोबरच त्यांच्या मनाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडतो. विशेष म्हणजे हे उपक्रम केवळ उन्हाळी शिबिरापुरते मर्यादित नसून वर्षभर सातत्याने राबविले जात असल्याने विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ते अत्यंत उपयुक्त ठरत आहेत.
उद्घाटन प्रसंगी बोलताना प्रा. रामदास झोळ यांनी विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, शारीरिक व मानसिक विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. Brain Gym व विविध शारीरिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता, आत्मविश्वास आणि आरोग्य सुधारते, असे त्यांनी नमूद केले. तसेच अशा शिबिरांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, शिस्त व टीमवर्कची भावना विकसित होते, असेही त्यांनी सांगितले.
या शिबिरात विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये मैदानी खेळ, लाठी-काठी, तलवारबाजी, कराटे, मल्लखांब तसेच स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत सुयोग्य व शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले.
शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या माध्यमातून त्यांना विविध कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उपक्रम निश्चितच मोलाचा ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.या संपूर्ण शिबिराचे नियोजन डॉ. संतोष मचाले यांनी यशस्वीरित्या केले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!