करमाळा शहर विकास आघाडीचे गटनेते नगरसेवक मा. श्री. संजय (पप्पू) सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त प्रा.गणेश शिंदे यांच्या जीवन सुंदर आहे व्याख्यानाचे आयोजन
करमाळा प्रतिनिधी: करमाळा शहर विकास आघाडीचे गटनेते व नगरसेवक मा. श्री. संजय (पप्पू) सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाच्या वतीने एक प्रेरणादायी सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आला असून, “जीवन सुंदर आहे” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम बुधवार, दि. २२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सावंत गल्ली गार्डन, सावंत गल्ली, करमाळा येथे पार पडणार आहे. या व्याख्यानासाठी प्रा. गणेश शिंदे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार असून, ते आपल्या प्रभावी शैलीतून जीवनातील सकारात्मकता, आत्मविश्वास, संघर्षातून उभे राहण्याची ताकद आणि यशस्वी जीवनाचे विविध पैलू यावर मार्गदर्शन करणार आहेत.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत अनेकजण मानसिक तणाव, नैराश्य व नकारात्मकतेला सामोरे जात आहेत. अशा परिस्थितीत “जीवन सुंदर आहे” या विषयावर आधारित हे व्याख्यान नागरिकांना नवसंजीवनी देणारे ठरणार आहे. विशेषतः युवक व विद्यार्थ्यांना या व्याख्यानातून योग्य दिशा व प्रेरणा मिळणार आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्याची एक वेगळी आणि समाजाभिमुख परंपरा जपली जात असल्याचे दिसून येते. मा. संजय (पप्पू) सावंत यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत, त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद मानला जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाने या कार्यक्रमाचे आयोजन केले असून, करमाळा शहरातील नागरिक, युवक, विद्यार्थी व सर्व स्तरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रेरणादायी व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन छत्रपती शिवाजी तरुण मंडळ करमाळा यांच्यावतीने करण्यात आले आहे.


