कारगिल भवनावरील तोडफोडीची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी – अक्रुर शिंदे
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहरातील कारगिल भवनावर चिखलफेक करून इमारतीच्या काचा फोडण्यात आल्याच्या घटनेबाबत करमाळा तालुका आजी-माजी सैनिक कल्याणकारी संघटनेचे पदाधिकारी अक्रुर शिंदे यांनी खेद व्यक्त करत या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कारगिल भवन हे देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शहीद जवानांच्या स्मृतींना अभिवादन करणारे प्रेरणास्थळ आहे. अशा स्मारकाचे नुकसान होणे ही दुर्दैवी बाब असून, या घटनेमुळे नागरिकांसह माजी सैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्याचे अक्रुर शिंदे यांनी म्हटले.
या प्रकरणातील सत्य समोर आणण्यासाठी पोलिस प्रशासनाने निष्पक्ष आणि सखोल तपास करून संबंधित व्यक्तींचा शोध घ्यावा तसेच कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
यासोबतच कारगिल भवन परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे, सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करणे, नियमित देखभाल करणे आणि पोलिस गस्त वाढविणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा उपाययोजनांमुळे भविष्यात अशा घटना टाळण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शहीद जवानांच्या स्मारकांचा सन्मान राखणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असून, समाजातील सर्व घटकांनी अशा स्मारकांविषयी आदराची भावना जपावी, असे आवाहन अक्रुर शिंदे, करमाळा तालुका आजी-माजी सैनिक कल्याणकारी संघटनेच्या वतीने करण्यात आले.


