Tuesday, November 17, 2026
Latest:
Uncategorized

बीजमाता पद्मश्री राहीबाईंच्या विचारांचा जागर; जिव्हाळा स्नेहमेळाव्यात वीस समाजरत्नांचा गौरव.

करमाळा प्रतिनिधी : मातीच्या कुशीत जपलेले बीज उद्याची सृष्टी घडवते, तर समाजात रुजलेला सेवाभाव भावी पिढ्यांचे भविष्य घडवतो. निसर्गसंवर्धन आणि समाजसेवेच्या या उदात्त मूल्यांचा संगम यशकल्याणी सेवाभवन येथे आयोजित स्नेहमेळाव्यात अनुभवायला मिळाला.यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था, पुणे, ग्रामसुधार समिती आणिजिव्हाळा ग्रुप, करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात पद्मश्री बीजमाता राहीबाई सोमा पोपेरे यांचे प्रेरणादायी मनोगत आणि विविध क्षेत्रांतील १९ व्यक्ती व एका संस्थेचा गौरव ही प्रमुख आकर्षणे ठरली.
देशी बियाण्यांच्या संवर्धनातून राष्ट्रीय स्तरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या राहीबाई पोपेरे यांच्या मनोगताने कार्यक्रमाला विशेष वैचारिक उंची प्राप्त झाली. पारंपरिक बियाण्यांचे जतन, जैवविविधतेचे संरक्षण आणि मातीशी असलेले माणसाचे नाते यांचे महत्त्व त्यांच्या जीवनकार्यातून अधोरेखित झाले. अनुभव, जिद्द आणि अथक परिश्रमांच्या बळावर त्यांनी उभारलेले कार्य उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरले.
या सोहळ्यात प्राचार्य आतिश क्षीरसागर यांना पद्मश्री डॉ. अरविंद गुप्ता विज्ञान प्रेरणा पुरस्कार, तर रामकृष्ण (भाऊ) माने आणि डॉ. सुभाष सुराणा यांना श्रद्धेय वसंतराव दिवेकर जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. श्रद्धेय वसंतराव दिवेकर स्मृती पुरस्काराने दीपक (आबा) देशमुख, महेंद्र पाटील, सुहास गलांडे, श्री दत्त देवस्थान समिती कोंढारचिंचोली, शिवाजीराव बंडगर, डॉ. बाबुराव हिरडे, नानासाहेब साळुंके, वैभव पोळ, किरण डोके-पाटील, डॉ. प्रमोद कांबळे, विक्रमदादा आल्हाट, डॉ. सुनिता दोशी, चित्रकार निवास कन्हेरे, पत्रकार गजेंद्र पोळ, हर्षाली नाईकनवरे, सोनाली नितीन तकिक पाटील आणि राजेंद्र रणसिंग यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजक तथा यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. गणेश करे-पाटील यांनी प्रास्ताविकातून प्रमुख मान्यवरांचा परिचय करून देत वीसही पुरस्कारार्थींच्या सामाजिक, शैक्षणिक व विधायक कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अर्जुनराव लावंड यांनी भूषवले. व्यासपीठावर लक्ष्मणराव साळुंके, प्रा. बाळकृष्ण लावंड, प्रा. कल्याणराव साळुंके, लष्कर गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी रामकृष्ण माने, डॉ. सुभाष सुराणा, डॉ. बाबुराव हिरडे, सोनाली तकिक आणि अक्रूर शिंदे यांनी मनोगते व्यक्त केली.
स्नेहमेळाव्यात गीत, संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचीही मेजवानी लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. जयेश पवार, भाऊसाहेब माने, भिवा वाघमोडे, संदीप मोटे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. विष्णू शिंदे यांनी केले.
‌सन्मान हा केवळ व्यक्तीचा नसतो, तर तिच्या कार्यामागील निष्ठेचा आणि समाजऋणाच्या जाणिवेचा असतो.याच विचाराला अधोरेखित करणारा हा सोहळा माणुसकी, कृतज्ञता आणि सेवाभावाचा प्रेरणोत्सव ठरला.

error: Don\'t try to copy. Content is protected !!