Thursday, September 17, 2026
Latest:
करमाळा

ज्ञानेश्वर वाचन मंदिराचा ७५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी 

श्री ज्ञानेश्वर वाचन मंदिर मुक्तद्वार वाचनालयाचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमा प्रसंगी संविधान उद्देशिका, सरस्वती देवी, ग्रं.शा.ज. एस आर रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पुजन करुन निवडक ग्रंथांना पुष्पहार व फुले वाहून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मुख्याधिकारी सचिन तपसे हे होते. प्रस्ताविक धनंजय कविटकर यांनी केले.यावेळी वाचकवर्ग, विद्यार्थी-विद्यार्थीनी वाचक, सभासद, कर्मचारी वृंद व इतर चहुसंख्य नागरीक उपस्थित होते.

यावेळी वाचक सभासद चंद्रशेखर शिलवंत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थी दशेतील जून्या आठवणींना उजाळा देताना म्हणाले की, सन १९७५ पुर्वी वाचनालय हे श्री जगदंबा भाजी मार्केट मधील इमारतीत चालु होते. त्यावेळी असणारे ग्रंथपाल चांदगुडे, भणगे काका, यांनी मला चांगल्या प्रकारे सहकार्य केले. त्यावेळेसपासूनच मला वाचनाची आवड निर्माण झाली. त्यावेळेस वाचनालयात उपलब्ध असणारी व मला आवडणाऱ्या लेखकांची पुस्तके मला वाचनालयामध्ये सहज उपलब्ध होत होती. त्यावेळेस दरवर्षी दिवाळीत दिवाळी अंकाची वर्गणी भरुन आम्ही सर्व दिवाळी अंक वाचून काढत होतो. त्याकाळी आमचे आवडते लेखक सुहास शिरवळकर, नारायण धारप, रामचंद्र सडेकर, गुरुनाथ नाईक, अशोक थोरे, सुरेश वैद्य, बाबा कदम, चंद्रकांत काकोडकर, पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, द. मा. मिराजदार यांच्यासह इतर लेखकांची पुस्तके मी आवडीने वाचत होतो. त्यावेळेस आता सारखे टीव्ही व मोबाईल नसल्यामुळे वाचनालयातील मासिके, पुस्तके, दिवाळी अंक इत्यादी शिवाय मला दुसरा पर्यायच नव्हता. तसेच आमच्या कुटुंबातील सर्वांनाच वाचनाची आवड असल्याने मी आणलेली सर्व पुस्तके आम्ही वाचत होतो. पुढे बोलताना ते म्हणाले की, बघता बघता या वाचनालयाने 75 वर्षाहून अधिक काळ वाचन संस्कृती जतन करुन ती टिकवून ठेवलेली आहे. वाचनालयाच्या स्थापनेपासून आजपर्यंत वाचनालयीन कर्मचारी वृंद यांनी वाचकांना नेहमी चांगल्या प्रकारे सेवा दिलेली आहे. यापुढेही ही सेवा अशीच राहो अशी अपेक्षा बाळगातो. नव्या पिढीला संदेश देताना ते म्हणाले की, युवा पिढीने वाचनालयाकडे आले पाहिजे आणि वाचन संस्कृती जपून ठेवली पाहिजे असे आवाहन केले.यावेळी कार्यक्रमा प्रसंगी विकास सुरु व रामदास कांबळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी कार्यक्रमास शशांक भोसले, स्वप्निल बाळेकर, हिंदूराव जगताप, मल्हारी चांदगुडे, तुषार टंकसाळे, संकल्प शहाणे, श्रीमती शितल बहाड, अश्विनी जाधव, प्रदिप चौकटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचा समारोप वर्धापनदिनाचा केक कापुन, संविधानाची शपथ व पसायदानाने करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्वाती माने यांनी केले तर विपुल पुजारी यांनी आभार मानले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!