करमाळ्यासाठी पुरेश्या ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर उपलब्ध असलेल्या कोविड सेंटरची उभारणी करावी -तृप्ती साखरे

करमाळा प्रतिनिधी लॉकडाउनच्या काळात आपल्या करमाळा तालुक्यातील सर्वांनीच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन केले होते,या 3 महिन्यात कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी झालो होतो, पण अनलॉक सुरू झाल्यानंतर मात्र आपण शासनाने घालून दिलेले नियम न पाळल्यामुळे तसेच करमाळा तालुका तीन जिल्ह्याच्या सीमेवर असल्याने वर्दळ वाढल्याने मागील महिन्यापासून तालुक्यात कोरोना चा प्रादुर्भाव वाढतच आहे. यासाठी तालुक्याचे विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांनी तालुक्यात भेट देऊन कोविड सेंटर सोबत रॅपिड अँटीजेन टेस्टची सुविधा सुरू केल्यामुळे कोरोना चे निदान होऊन त्यावर उपचार करणे सोपे झाले होते.ज्यांना सौम्य लक्षणे आहेत त्यांच्यावर कोविड सेंटर मध्ये उपचार होत आहेत पण ज्यांची परिस्थिती गंभीर असेल अशा रुग्णांना मात्र उपचार करण्याची सोय तालुक्यात नाही, नाईलाजाने या रुग्णांना अकलूज, बार्शी, सोलापूर, बारामती अशा ठिकाणी व्हेंटिलेटरयुक्त हॉस्पिटलमध्ये किंवा कोविड सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल करावे लागत आहे.यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात सुरू असलेल्या कोविड सेंटर मध्ये फक्त क्वारेंटाईन करण्याची सोय आहे आणि सरकारी दवाखान्यात फक्त 10 ऑक्सिजन बेड आहेत.
सध्या कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता तालुक्याच्या ठिकाणी व्हेंटिलेटर तसेच ऑक्सिजन ची सोय असणारे कोविड सेंटर उभा करणं अतिशय गरजे च झालं आहे.तालुक्याच्या ठिकाणी असणारे आय. सी. यु. हॉस्पिटल आता शासनाने ताब्यात घेऊन तिथे गंभीर रुग्णांना उपचार सुरू करायला हवेत किंवा अकलूजमधील डॉक्टरांनी स्वतः पुढाकार घेऊन सुरू केलेल्या कोविड हॉस्पिटल सारखे हॉस्पिटल आपल्या इथेही सुरु करायला हवे.यासाठी तालुक्यात काम करणाऱ्या सामाजिक संस्था यांनी ही आपला खारीचा वाटा उचलून मदत करायला हवी आजचा आकडा पाहता जवळपास 1348 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून 490 रुग्णांवर उपचार सुरू आहेत 846 बरे होऊन घरी गेले आहेत तर 22 जणांचा मृत्यू झाला आहे.आदरणीय पालकमंत्री दत्तात्रय भरणे,आमदार संजयमामा शिंदे याबाबतीत लक्ष घालून तालुक्यात व्हेंटिलेटर बेड तसेच ऑक्सिजनची सोय असणारे कोविड सेंटर उभारण्यासाठी योग्य ती पाऊले उचलतील असा विश्वास आहे.
