शोषतांचा मुक्तिदाता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
स्वतःच्या असामान्य कर्तृत्वाने काळाच्या वाटेवर तेजाची दमदार पावले उमटविणारा थोर तपस्वी, शोषितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडणारा महायोद्धा, उपेक्षितांच्या अंधकारमय जीवनामधे अस्मितेची ज्योत पेटविणारा प्रकाशसूर्य, समाजाने धिक्कारलेल्या गावकुसाबाहेरच्या जगण्याला माणूसपण देणारा महामानव, पाच हजार वर्षांचा विषमतावादी इतिहास गाडून नवीन इतिहास निर्माण करणारा महान इतिहासकार, जगातील अशी एकमेव व्यक्ती ज्याने रक्ताचा एक थेंबही न सांडता सामाजिक धार्मिक राजनैतिक क्रांती घडवून आणली असा महान क्रांतिकारक, ज्याने महान संविधान लिहीलं असा संविधान निर्माता, ज्यांचे वादविवाद ऐकण्यासाठी शहरातील इतर न्यायाधीश हजर राहायचे असा जगातील एकमेव वकील, स्त्रियांना समाजव्यवस्थेच्या जोखडातून मुक्त करून भारतीय स्त्रीला कायदेशीररित्या सर्वांगाने सक्षम करणारे ‘स्त्रियांचे बाबा’ यांची आज जयंती.
जगातील अशी जयंती जी १५० देशातील लोक साजरी करतात. म्हणूनच अशा विश्वरत्नास ज्याने आपल्याला धड़ावरल्या मस्तकाची जाणीव करून दिली, त्यास मानाचा मुजरा.
खरंतर हा देवही नव्हता, देवदूतही नव्हता तर खऱ्या अर्थाने माणसातल्या माणुसकीची पूजा करणारा संत होता. खरंच ! बाबासाहेबांचे विचार डोक्यावर घेण्यासारखे नाहीत तर डोक्यात घेण्यासारखे आहेत.
बाबासाहेबांचे आयुष्य म्हणजे एक अखंड संघर्ष ! लोकशाही यावी म्हणून त्यांनी आपले आयुष्य वेचले, विद्वत्ता पणाला लावली, दलित जाती जमातीत स्वाभिमानाची ज्योत पेटविली, मानवाला खरा मानवी चेहरा देणारे सामाजिक तत्त्वज्ञान विशद केले. आणि म्हणूनच डॉ. बाबासाहेबांचे अनुयायी असलेल्या आजच्या तरुण विचारवंतावर इतरांपेक्षा मणभर जास्त जबाबदारी आहे ती त्यांचे क्रांतीकारी तत्त्वज्ञान काटेकोरपणे पाळण्याची.
ते म्हणायचे, लोकप्रतिनिधी विद्वान व कर्तृत्ववान नसले तरी चालतील पण समाजसुधारणेसाठी निष्ठावान हवेत. चांगले शासन व चांगल्या प्रशासनापेक्षा जबाबदार शासन व जबाबदार प्रशासन महत्त्वाचे आहे म्हणून लोकांनी सूज्ञपणे जबाबदार प्रतिनिधी निवडावेत, आणि निवडणुकीनंतरही पाच वर्षे शासन प्रशासनावर मतदारांनी वचक ठेवावा.केवढी व्यापक दूरदृष्टी !त्यांना अभिप्रेत असलेला मतदार त्यांनी आपल्या विचारातून असा मांडला.
बाबासाहेबांच्या दृष्टीकोनातून वाईट वृत्तीविरहित समविचारी माणूस मग तो कोणत्याही जातीचा असो तो आपला मित्र असायला हवा. आणि म्हणूनच बाबासाहेबांना त्यांच्या लढयात कित्येक सवर्णांनी साथ दिल्याचे आपल्याला दिसते, कारण भगवान बुध्द, संत कबीर आणि जोतिबा फुले या तीन गुरूंनी त्यांची वैचारीक जडणघडण केली होती. त्यांना स्वातंत्र्य, समता, बंधुता शिकवणारा धर्म आवडत होता.
कोणत्याही समाजाचे मूल्यमापन हे त्या समाजातल्या स्त्रियांच्या परिस्थितीवरून होते म्हणूनच स्त्रियांच्या विकासाकडे लक्ष केंद्रित करण्याची त्यांची आग्रही भूमिका होती. त्यामुळेच स्त्री सक्षमीकरणाचे अनेक निर्णय घेऊन बाबांनी त्यांची अंमलबजावणी केली. आपल्या चळवळीत देखील त्यांनी स्त्रियांना सहभागी करून घेतले होते हे विशेष.
स्त्री स्वतंत्र झाली नाही ना, तर अर्धा समाज अशक्त होईल असे ते म्हणायचे, त्यासाठी ते आपल्या लेखांतून, व्याख्यानांतून पोटतिडकीने या विषयी आपली भूमिका मांडायचे. त्यामुळेच काही वर्षांपूर्वीची स्त्री, जी सबलतेचा अहंकार बाळगणाऱ्या पुरुषाच्या पाठीमागून चालायची तीच स्त्री आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात म्हणेल ते काम करतेय, स्वतःची कौशल्यक्षमता वाढवून आजच्या आवाहनांना सामोरे जातेय. आम्हा स्त्रियांच्या पंखांना बळकटी देण्याचे काम आमच्या ‘ बाबांनीच ‘ केलं.
खरचं बाबा, मोजू कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची !
म्हणूनचं आज पुन्हा म्हणावेसे वाटते की….
छाती ठोक हे सांगू जगाला,
असा विद्वान होणार नाही…
ज्याच्या घटनेवर चाले हे राज,
ज्ञानवैभव हे त्यालाच साजं..
कुबेरालाही वाटावी लाज,
असा धनवान होणार नाही॥.
म्हणून आज या निमित्ताने बाबासाहेबांच्या विचारांचे बळ घेऊन जगण्याचा संकल्प करणे, तो काटेकोरपणे अमलात आणण्यासाठी राबणे हे बाबासाहेबांचे खरे स्मरण ठरेल. कारण,
असा मोहरा झाला नाही,
पुढे कधी ना होणार,
बाबासाहेब तुमचे नाव
सतत गर्जत राहणार…सतत गर्जत राहणार ….
©️🖋️सौ. शगुफ्ता शेख (हुंडेकरी) ,
करमाळा.