करमाळा भूषण पुरस्कार डॉ. प्रदीप आवटे यांना जाहीर- १० मार्चला खातगाव येथे पुरस्काराचे वितरण
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील ग्रामसुधार समितीचा सन्मानाचा ‘करमाळा भूषण’ पुरस्कार यावर्षी आरोग्य अधिकारी , कवी व लेखक डॉ. प्रदीप आवटे यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण येत्या रविवारी (ता.10) सकाळी साडेअकरा वाजता उजनी परिसरात खातगाव येथील रणसिंग फार्मवर होणार आहे. यावेळी जास्तीत जास्त नागरीकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ग्रामसुधार समितीचे संचालक राजेंद्र रणसिंग, संस्थेचे उपाध्यक्ष नाथाजीराव शिंदे, सचिव डी. जी. पाखरे यांनी केले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार व राज्य डिजिटल मिडीया पत्रकार संघाचे अध्यक्ष राजा माने तसेच सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासक कुंदन भोळे, हे आहेत. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामसुधार समितीचे ॲड. डॉ. बाबूराव हिरडे हे राहणार आहेत.
या कार्यक्रमात कु. नम्रता रणसिंग (अधिक्षक- वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, म. शासन) यांचा तसेच आदर्श युवा किर्तनकार ह.भ.प. लक्ष्मण महाराज झेंडे यांचाही सत्कार करण्यात येणार आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते व्ही.आर. गायकवाड, ज्येष्ठ कवी प्रकाश लावंड, साहित्यिका डाॅ. सुनिता दोशी ,वृक्षप्रेमी संदिप काळे ,लोकविकास डेअरीचे दिपक आबा देशमुख , जिल्हा बँकेचे व्यवस्थापक आर.डी. गोटे यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी शिवारफेरी तसेच प्रथितयश कवींचे’ कविसंमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. यावेळी नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहावे असे अवाहन संचालक प्रा. शिवाजीराव बंडगर यांनी केले.डॉ. प्रदीप आवटे हे राज्याच्या आरोग्य विभागात सहाय्यक संचालक म्हणून नागपूर येथे कार्यरत आहेत. १९९३ ते २००५ या कालावधीत ते कोर्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा रूग्णालय करमाळा येथे वैद्यकिय अधिकारी म्हणून कार्यरत होते. २००९ ते २०२२ या काळात साथरोग नियंत्रण विभागाचे राज्य सर्व्हेक्षण अधिकारी होते. तसेच २००६ ते २००९ या कालावधीत जागतिक आरोग्य संघटनेच्या पोलिओ निर्मुलन कार्यक्रमात उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश व गुजरात येथे कार्यरत होते. आंतरराष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेत हनोई, व्हिएतनाम येथे ते भारताचे प्रतिनिधी म्हणून सहभागी झाले होते. तसेच आंतरराष्ट्रीय परिषदेत तुर्कस्तान येते सहभागी झाले होते. सन १९९७ साली उत्कृष्ट ग्रामीण आरोग्यसेवेबद्दल राज्यशासनाचे मानपत्रही त्यांना मिळाले आहे. याशिवाय त्यांचे माझ्या आभाळाची गोष्ट, धम्मधारा व या अनाम शहरात हे कवितासंग्रह प्रसिध्द झाले असून जग्गुभैय्या जिंदाबाद.., जादु की झमकी.., आणखी एक स्वल्पविराम.., नवा भुगोल घडवू.. आणि सेंट पर्सेट आजचे न्यायालय हे बालसाहित्य तसेच अडीच अक्षराची गोष्ट व विंडोसीट हे ललित ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. याशिवाय अनेक दैनिकातून व नियतकालिकातून त्यांचे लिखाण प्रसिध्द आहे. एक उत्साही आणि सर्वसामान्यात मिसळणारे व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख आहे.
