सीना कोळगाव उपसा सिंचन योजना सुरु तर दहिगाव उपसाचे गुरुवार दि. २० मार्च पासुन उन्हाळी आवर्तन दिले जाणार-आमदार नारायण आबा पाटील
करमाळा प्रतिनिधी सीना कोळगाव उपसा सिंचन योजना सुरु तर दहिगाव उपसाचे गुरुवार दि. २० मार्च पासुन उन्हाळी आवर्तन दिले जाणार असल्याचे आमदार नारायण (आबा) पाटील यांनी सांगितले. याबाबत अधिक सविस्तर बोलताना आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले की धाराशिव येथे पार पडलेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आपण सीना कोळगाव उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी आवर्तन देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता या योजनेतुन शेतीसाठी पाणी देणे सुरू झाले आहे.
तर अधिवेशन काळात मंत्रालयात पार पडलेल्या उजनी धरण कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आपण दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या उन्हाळी आवर्तनाची मागणी केली होती. काही दिवसांपूर्वी दहिगाव उपसा सिंचन योजनेचे रब्बी आवर्तन संपले होते. पुर्व भागातील काही ठिकाणी तांत्रिक अडचणी असलेले
अपवाद वगळता सर्वत्र मुबलक पाणी दिले गेले. यामुळे थोडासा अवधी लोटल्यानंतर आता गुरुवार पासून परत एकदा दहिगाव उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी आवर्तन सुरु करण्याच्या सुचना आपण संबंधित विभागास दिल्या आहेत. त्यानूसार या विभागाकडून उन्हाळी आवर्तनासाठी तयारी सुध्दा करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक पंप दुरुस्ती तसेच मुख्य कालवा संबंधित अडचणी दुर करण्यात आल्या असुन नियोजना प्रमाणे पाणी वाटप करण्याची सुचनाही आपण अधिकाऱ्यांना दिली आहे. पाटबंधारे अधिनियमानुसार योग्य त्या सुचना अंमलात आणुन दहिगाव उपसा सिंचन योजनेचे हे आवर्तन दिले जाईल. तसेच उन्हाळ्यात होणारी संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन या आवर्तनाच्या माध्यमातून काही प्रश्न सोडवले जातील. शेतकऱ्यांनी या आवर्तनात सहकार्य करावे असे आवाहन आमदार नारायण आबा पाटील यांनी केले.
