भूम–परंडा डेपोच्या सर्व बसेस गौंडरे फाट्यावर थांबणार ग्रामस्थांकडून दिग्विजय बागल यांचे आभार
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील पूर्व भागातील गौंडरे फाटा येथे आता भूम व परंडा आगारातील सर्व एस.टी. बसेस थांबणार असल्याची माहिती गौंडरे ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर बिचितकर यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, आतापर्यंत भूम व परंडा आगारातील एस.टी. बसेस गौंडरे फाट्यावर थांबा घेत नसल्याने गौंडरे, निमगाव हवेली, कोळगाव, हिवरे व नेरले या परिसरातील नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना करमाळा व परांडा येथे ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. बसेस थांबा न घेतल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती.
ही समस्या लक्षात घेऊन ग्रामस्थांनी करमाळा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिग्विजय भैय्या बागल यांची भेट घेऊन गौंडरे फाट्यावर भूम व परंडा आगारातील सर्व एस.टी. बसेसना थांबा देण्याची मागणी केली होती. त्यानुसार दिग्विजय बागल यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले.
या मागणीस धाराशिव येथील विभाग नियंत्रकांनी सकारात्मक प्रतिसाद देत लेखी पत्र दिले असून, त्यामुळे हे काम मार्गी लागले आहे. यामुळे करमाळा तालुक्यातील पूर्व भागातील प्रवासी बांधवांना मोठा दिलासा मिळाला असून ग्रामस्थांनी दिग्विजय भैय्या बागल यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत. या कामासाठी मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक सतीश बापू निळ यांचेही सहकार्य लाभले असल्याचे बिचितकर यांनी सांगितले.
चौकट
“गेल्या अनेक वर्षांपासून ही आमची मागणी होती. मात्र कोणीही याकडे लक्ष दिले नव्हते. आता भूम व परंडा आगारातील सर्व एस.टी. बसेस गौंडरे फाट्यावर थांबणार असल्याने आमची गैरसोय दूर होणार असून वेळेचीही बचत होईल. यासाठी दिग्विजय भैय्या बागल यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत.”
— सुरज काळे, शालेय विद्यार्थी


