Uncategorized

पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी ५.८० लाखांचा चोरीचा ऐवज २४ तासांत जप्त

करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अवघ्या २४ तासांत चोरीचा गुन्हा उघडकीस आणत सुमारे ५ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व चांदीचा छल्ला असा एकूण ५ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
दि. ०४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास सुलोचना मच्छिंद्र लोहार (वय ६०, रा. डोंबिवली, ता. कल्याण, जि. ठाणे) या नातवाच्या लग्नासाठी करमाळा तालुक्यातील वरकटणे येथे आल्या होत्या. लग्नानंतर त्या करमाळा एस.टी. स्टॅण्ड येथून पंढरपूर–वाडा जाणाऱ्या एस.टी. बसमध्ये प्रवासासाठी चढल्या असता गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधील सोन्याचे मंगळसूत्र व चांदीचा छल्ला चोरून नेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी दि. ०५ जानेवारी २०२६ रोजी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच करमाळा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तत्काळ तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत आरोपी रविता प्रशांत भोसले (रा. परंडा, जि. धाराशिव) व आशा लखन पवार (रा. महातपुरी, ता. गंगाखेड, जि. परभणी) यांना नारायणगाव (जि. पुणे) येथून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी करमाळा एस.टी. स्टॅण्ड येथील चोरीची कबुली दिली.
आरोपींकडून चोरीस गेलेला संपूर्ण ऐवज हस्तगत करण्यात आला असून हा गुन्हा अवघ्या २४ तासांत उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार पी.टी. आरकिले हे करीत आहेत.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अंजना कृष्णा व्ही.एस. तसेच पोलीस निरीक्षक श्री. रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोहेकॉ अजित उबाळे, पोना मनिष पवार, वैभव ठेंगल, रविराज गटकुळ, अर्जुन गोसावी, भराटे, रंदिल, खोटे, न्हावकर तसेच सायबर पोलीस ठाण्यातील व्यंकटेश मोरे यांनी ही कामगिरी पार पाडली.

error: Don\'t try to copy. Content is protected !!