करमाळा

केत्तुर पंचायत समिती गणातून ॲड. अजिनाथ विघ्ने यांचा उमेदवारी अर्ज दाखल; समर्थकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

करमाळा प्रतिनिधी : केत्तुर पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) व माजी आमदार संजयमामा शिंदे गटाचे अभ्यासू व कार्यकुशल उमेदवार ॲड. अजिनाथ विघ्ने यांनी मंगळवारी (दि. २०) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी केत्तुर व परिसरातील विविध गावांमधून आलेल्या वाहनांच्या ताफ्यासह कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल करताना परिसरात उत्साहाचे वातावरण दिसून आले. कार्यकर्त्यांनी घोषणा देत आपला पाठिंबा व्यक्त केला. केत्तुर व परिसरातील सर्वसामान्य नागरिकांचा ‘हक्काचा माणूस’ अशी ॲड. विघ्ने यांची ओळख असून, सामाजिक, शैक्षणिक व कायदेशीर मदतीच्या माध्यमातून त्यांनी केलेले कार्य सर्वश्रुत आहे.
ॲड. विघ्ने यांनी यापूर्वीही विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला असून, सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला जनसामान्यांतून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
२०१२ साली झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत अल्प मतांनी त्यांचा पराभव झाला होता. मात्र मागील काही वर्षांत त्यांनी जनसंपर्क वाढवत सामाजिक कार्याची घडी अधिक मजबूत केली आहे. त्यामुळे यावेळी त्यांच्या कार्याची पोचपावती मतदारांकडून मिळेल, असा विश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, केत्तुर गणात निवडणूक रंगत वाढू लागली असून, ॲड. विघ्ने यांच्या उमेदवारीमुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!