माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या पाठिंब्यावर महायुतीचा विजय;सौ. रश्मी दीदी बागल यांचे जगताप कुटुंबाकडून अभिनंदन, भाऊंचा दिदीला आशीर्वाद*

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील पांडे जिल्हा परिषद गटातून स्वर्गीय दिगंबर (बागल मामा) यांच्या कन्या रश्मी दिगंबरराव बागल या बहुमताने जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांच्या या दणदणीत विजयामुळे तालुक्यात राजकीय आणि सामाजिक स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या विजयानिमित्त माजी आमदार जयवंतराव जगताप, त्यांच्या धर्मपत्नी सौ. नंदिनीताई जगताप, स्नुषा तसेच संपूर्ण जगताप परिवाराच्या वतीने रश्मी दीदी बागल यांचे औक्षण करून ओटी भरत मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. यावेळी जयवंतराव जगताप यांनी रश्मी दीदींना “लाडकी लेक” असे संबोधत मायेचा आशीर्वाद व पाठबळ दिले.
निवडणूक काळात जयवंतराव जगताप यांनी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दर्शविला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली आणि कार्यकर्त्यांच्या एकत्रित प्रयत्नांतून करमाळा तालुक्यात महायुतीला उल्लेखनीय यश मिळाले. या पार्श्वभूमीवर रश्मी दीदी बागल यांच्या विजयातही त्यांच्या पाठिंब्याचा मोठा वाटा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पक्षभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे काम करण्याचा संदेश जयवंतराव जगताप यांनी आपल्या कृतीतून दिला आहे. सुसंस्कृत राजकारण आणि जबाबदार नेतृत्वाचा आदर्श त्यांनी नव्या पिढीसमोर ठेवला असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी नवनिर्वाचित सदस्य रश्मी दीदी बागल तसेच दिग्विजय बागल यांनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा सत्कार करून त्यांच्या मार्गदर्शन व पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.


