Wednesday, March 11, 2026
Latest:
करमाळा

कोळेगाव प्रकल्प कार्यालय परांड्यातच सुरू ठेवावे; अन्यथा आंदोलनाचा इशारा – सतीश नीळ


करमाळा प्रतिनिधी: सीना-कोळेगाव धरणाचा पाणी साठा सीना-कोळेगाव प्रकल्प विभाग, परांडा यांच्या ताब्यात देऊन हे विभागीय कार्यालय बंद न करता कायम सुरू ठेवावे, अशी मागणी सीना-कोळेगाव धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सतीश नीळ यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
श्री. नीळ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या सीना-कोळेगाव धरणाचा पाणी साठा पाटबंधारे विभाग क्र. १, धाराशिव या विभागीय कार्यालयाकडे आहे. मात्र हे कार्यालय परांडा येथून सुमारे ८० किलोमीटर अंतरावर असल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ घेण्यासाठी तसेच विविध प्रकारच्या परवानग्या मिळविण्यासाठी धाराशिव येथे जावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून वेळ व आर्थिक खर्चही वाढत आहे.
यामुळे सीना-कोळेगाव धरणाचा पाणी साठा सीना-कोळेगाव प्रकल्प विभाग, परांडा यांच्या ताब्यात देण्यात यावा आणि हे विभागीय कार्यालय कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देऊन धरणग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी विनंतीही निवेदनात करण्यात आली आहे.
दरम्यान, या मागणीची दखल न घेतल्यास परांडा व करमाळा तालुक्यातील सर्व धरणग्रस्त शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही सतीश नीळ यांनी दिला आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!