करमाळा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; सौ. रश्मी दिदी बागल यांची जिल्हा परिषदेत भाजपच्या गटनेतेपदी निवड
करमाळा प्रतिनिधी : सोलापूर जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षातर्फे निवडून आलेल्या सदस्यांमधून पक्षाच्या गटनेत्यांची निवड जाहीर करण्यात आली असून, रश्मी दीदी दिगंबर बागल यांची भाजपच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे करमाळा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोलापूर जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे एकूण ३८ सदस्य विजयी झाले आहेत. या विजयी सदस्यांमधून पक्षाच्या वतीने सभागृहातील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. त्यानुसार रश्मी दीदी बागल यांच्याकडे गटनेतेपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
तसेच प्रदीप वसंत खांडेकर यांची उपपक्षनेता, चेतनसिंह तात्यासाहेब केदार सावंत यांची पक्ष प्रतोद (व्हीप) तर नेताजी गंगाधर खंडागळे यांची पक्ष प्रवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबाबतची अधिकृत माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास पत्राद्वारे कळविण्यात आली आहे.
जिल्हा परिषद सभागृहात पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडणे, सदस्यांमध्ये समन्वय राखणे तसेच विकासकामांना गती देण्यासाठी रश्मी दीदी बागल यांचे नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची प्रतिक्रिया पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
रश्मी दीदी बागल यांच्या निवडीमुळे करमाळा तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील कार्यकाळात जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागातील विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
जिल्हा परिषदेत पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक बळकट करण्याबरोबरच सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेऊन विकासाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, अशी भावना देखील यावेळी व्यक्त करण्यात आली आहे.


