Thursday, September 17, 2026
Latest:
करमाळा

करमाळ्यातील दीड कोटींच्या रस्ते कामात ‘मोठा’ डोलारा; जाडी आणि रुंदीमध्ये कपात केल्याचा खळबळजनक आरोप


करमाळा (प्रतिनिधी):
करमाळा शहराच्या जुन्या बायपासवरील ‘ICICI बँक ते जुनी लाकडी मिल फंड गल्ली’ या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. सुमारे १ कोटी ५० लाख रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामात कंत्राटदाराने तांत्रिक नियमांना केराची टोपली दाखवली असून, रस्त्याची जाडी आणि रुंदीमध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते शंभूराजे जगताप यांनी केला आहे.
​या रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) मोठा निधी मंजूर केला आहे. निविदेतील (Tender) तांत्रिक निकषांनुसार, हा रस्ता सुमारे १८ इंच जाडीचा असणे अपेक्षित आहे. यामध्ये पायाचा थर आणि मुख्य काँक्रीट थर यांचा समावेश आहे. मात्र, प्रत्यक्षात कामाच्या ठिकाणी रस्त्याची जाडी अत्यंत कमी भरत असल्याचे समोर आले आहे.
​रुंदी आणि लांबीमध्येही संशय
मंजूर मोजमापानुसार रस्त्याचा काही भाग १० मीटर (३३ फूट) तर काही भाग ६ मीटर रुंद असणे बंधनकारक आहे. परंतु, कंत्राटदाराने सोयीनुसार अनेक ठिकाणी रुंदी कमी केल्याचे दिसून येत आहे. यामुळे शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीचा अपव्यय होत असून, कागदोपत्री मात्र पूर्ण मोजमाप दाखवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची भीती व्यक्त होत आहे.
​अनधिकृत स्पीड ब्रेकर्सचा जाच
कोणत्याही शास्त्रीय पद्धतीचा अवलंब न करता या रस्त्यावर ठिकठिकाणी अनधिकृत स्पीड ब्रेकर तयार करण्यात आले आहेत. हे स्पीड ब्रेकर वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत असून अपघाताला निमंत्रण देत आहेत. ‘भारतीय रस्ते काँग्रेस’च्या (IRC) नियमांचे येथे सर्रास उल्लंघन झाले आहे.
​”१.५० कोटी रुपयांचा निधी हा जनतेच्या कराचा पैसा आहे. जर निविदेनुसार रस्त्याची जाडी आणि रुंदी दिली जात नसेल, तर हे काम निकृष्ट दर्जाचे ठरते. आम्ही या कामाची ‘कोअर कटिंग’द्वारे तपासणी करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत पारदर्शक चौकशी होत नाही, तोपर्यंत कंत्राटदाराचे बिल रोखण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
— शंभूराजे जगताप (तक्रारदार)
​आता या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात आणि या कामाची फेर-तपासणी होणार का, याकडे करमाळावासियांचे लक्ष लागले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!