करमाळा तालुक्यात मतदार यादी अचूक करण्यासाठी SIR मॅपिंग मोहिमेला वेग; तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांचे नागरिकांना सक्रिय सहभागासाठी आवाहन
करमाळा प्रतिनिधी. करमाळा विधानसभा मतदारसंघात सखोल मतदार पुनर्निरीक्षण (SIR) कार्यक्रम अंतर्गत मतदार यादी अचूक करण्यासाठी मोहीम अंतिम टप्प्यात आहे. तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांनी नागरिकांना सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले असून, प्रत्येक मतदाराने आपल्या BLO (बूथ लेव्हल ऑफिसर) शी संपर्क साधून मॅपिंग पूर्ण करणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे.
या मोहिमेअंतर्गत करमाळा मतदारसंघातील एकूण ३,०४,८४७ मतदारांचे मॅपिंग करणे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत २,०७,७३० मतदारांचे मॅपिंग पूर्णत्वाच्या मार्गावर आहे, तर उर्वरित १,०४,३७० मतदारांचे मॅपिंग प्रगतीपथावर सुरू आहे. गावागावांत ही मोहीम ३४७ BLOs यांच्या माध्यमातून युद्धपातळीवर राबवली जात आहे.
मतदार यादी अचूक ठेवण्यासाठी सध्याच्या यादीची २००२ च्या यादीशी सखोल पडताळणी केली जात आहे. या प्रक्रियेत संबंधित मतदार किंवा त्यांच्या पालकांचे नाव जुन्या यादीत शोधून ऑनलाइन पडताळणीद्वारे मॅपिंग केले जाते. प्रशासनाचा मुख्य उद्देश मतदार यादी त्रुटीरहित व अचूक ठेवणे हा आहे.
मॅपिंगसाठी प्रशासनाने १४ प्रकारची कागदपत्रे ग्राह्य ठरवली आहेत. यात रेशन कार्ड, आधार कार्ड, पाणी-वीज बिल यांसारखी कागदपत्रे समाविष्ट आहेत. ज्यांचे नाव २००२ च्या यादीत आधीपासून आहे, त्यांना नव्याने कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही. BLO मार्फत जुना तपशील शोधून प्रक्रिया पूर्ण केली जाते. या मोहिमेमुळे मतदार यादीतील दुबार नावे कमी होतील तसेच भविष्यातील निवडणुकांसाठी अचूक मतदार नोंदणी सुनिश्चित होईल.
स्थलांतरित मतदारांनाही या प्रक्रियेत अडचण येणार नाही. पूर्वी इतर जिल्ह्यात वास्तव्यास असलेले आणि सध्या करमाळा तालुक्यात स्थायिक झालेले मतदारही आपले नाव वैध ठेवू शकतात. पत्ता बदलल्यासही मतदाराचे नाव एका ठिकाणी वैध राहील.
विशेषतः विधवा, अनाथ किंवा इतर दुर्बल घटक ज्यांच्याकडे जुनी कागदपत्रे उपलब्ध नाहीत, त्यांनी पतीचा मृत्यू दाखला, विवाह नोंद किंवा उपलब्ध पुरावे सादर करून मॅपिंग प्रक्रिया पूर्ण करावी. प्रशासनाचा उद्देश सर्व मतदारांना समान संधी मिळवून मतदार यादी अचूक करणे हा आहे.
कुर्डूवाडी परिसरात काही ठिकाणी BLO सक्रिय नसल्यामुळे मॅपिंग अपेक्षित गतीने नाही.याबाबत नागरिकांना स्वतः पुढाकार घेऊन BLO शी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
तहसीलदार शिल्पाताई ठोकडे म्हणाल्या, “मतदार यादी त्रुटीरहित करण्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक मतदाराने आपल्या भागातील BLO शी संपर्क साधून SIR अंतर्गत मॅपिंग वेळेत पूर्ण करावे. मॅपिंग न केल्यास मतदार यादीतून नाव वगळले जाण्याची शक्यता आहे
करमाळा तालुक्यातील सर्व मतदारांनी जागरूकता दाखवत आपले मॅपिंग पूर्ण करावे. या मोहिमेमुळे मतदार यादी अचूक राहील, दुबार नावे कमी होतील आणि भविष्यातील निवडणुकांसाठी योग्य तयारी होईल. करमाळा तालुक्यातील प्रत्येक मतदाराने जागरूक नागरिक म्हणून पुढाकार घेऊन आपले मॅपिंग पूर्ण करावे, असे आवाहन तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांनी केले आहे.


