करमाळा मोहरम उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अल्ताफशेठ तांबोळी; मिरवणूक प्रमुखपदी सोहेल पठाण प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी मोहरम उत्सव शांततामय वातावरणात साजरा करणार” – शौकतभाई नालबंद
करमाळा, प्रतिनिधी :
राज्यभर हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करमाळा शहरातील मोहरम उत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली असून, यंदाच्या मोहरम उत्सव समितीच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक अल्ताफशेठ तांबोळी यांची तर मिरवणूक प्रमुखपदी पैलवान सोहेल पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
नालबंद मंगल कार्यालय येथे माजी नगराध्यक्ष शौकतभाई नालबंद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. यावेळी अमीरशेठ तांबोळी, जाकीर वस्ताद, जाफर घोडके, पैलवान इमरान वस्ताद, अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष फारूक जमादार, पत्रकार राजू सय्यद, इस्माईल सय्यद, पैलवान सलमान घोडके, सारंग परदेशी, पप्पू सय्यद, अमर शेख, बिलाल कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत यंदाचा मोहरम उत्सव पारंपरिक पद्धतीने, कायद्याचे पालन करून आणि संविधानाच्या चौकटीत राहून उत्साहात साजरा करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. करमाळा शहरातील मोहरम उत्सवात मुस्लिम बांधवांसह हिंदू समाजाचाही मोठा सहभाग असतो. विविध समाजांच्या सवाऱ्या आणि डोल्यांमुळे हा उत्सव सर्वधर्मसमभावाचे जिवंत उदाहरण मानला जातो.
यामध्ये रजपूत समाजाची सुतार तालीम सवारी, लिंगायत समाजाची माहुले यांची सवारी, चिवटे यांचा डोला, कुंभार समाजाची सवारी तसेच रंभापूर येथील दुधाट यांची सवारी आदींचा समावेश असतो. या सर्व सवाऱ्यांमुळे मोहरम उत्सवाला विशेष धार्मिक आणि सामाजिक महत्त्व प्राप्त होते.
बैठकीस सुफरान शेख, भैय्या परदेशी, केतन परदेशी, फारुख कुरेशी, इरफान सय्यद, निहाल शेख, युसुफ शेख, अख्तर शेख, जावेद शेख, समीर शेख, शाहरुख नालबंद, सलीम मदारी, सादिक सय्यद, जावेद झारेकरी, दिलावर मुलाणी आदींसह मोठ्या संख्येने हिंदू व मुस्लिम बांधव उपस्थित होते.
चौकट
“हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणजे करमाळ्याचा मोहरम उत्सव”
– शौकतभाई नालबंद, माजी नगराध्यक्ष
“करमाळा शहरातील मोहरम उत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे जिवंत प्रतीक आहे. अनेक वर्षांपासून दोन्ही समाजातील बांधव खांद्याला खांदा लावून हा उत्सव उत्साहात साजरा करतात. मानाची समजली जाणारी नाल साहेबांची सवारी पाहण्यासाठी हिंदू बांधवही मोठ्या संख्येने उपस्थित असतात. मोहरम उत्सवात विविध हिंदू समाजांच्या सवाऱ्या आणि डोल्यांचाही मोठा सहभाग असतो. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी हा उत्सव शांततामय, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यात येणार आहे.” – शौकतभाई नालबंद.


