औदुंबरराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! बंद पडलेली करमाळा–कुर्डूवाडी एसटी पुन्हा धावणार; परिवहन मंत्र्यांच्या आदेशाने ग्रामीण भागाला दिलासा
करमाळा (प्रतिनिधी)
करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील हजारो नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली करमाळा–कुर्डूवाडी एसटी बस सेवा पुन्हा सुरू होणार असून, नेरले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक श्रीमंत औदुंबरराजे भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांना मुंबई येथे निवेदन देत बस सेवा तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक आदेश दिल्याने ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
करमाळा–कुर्डूवाडी ही बस हिसरे, कोळगाव, निमगाव, गौंडरे, नेरले, वरकुटे व बारलोणी मार्गे धावते. काही दिवसांपासून ही सेवा बंद असल्याने विद्यार्थी, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच नोकरदार वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः नेरले व गौंडरे या गावांसह परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना शिक्षण, बँकिंग व्यवहार, शासकीय कामे आणि दैनंदिन प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था शोधावी लागत होती.
नेरले हे सुमारे पाच हजार लोकसंख्येचे गाव असून गौंडरेची लोकसंख्या साडेतीन हजारांच्या आसपास आहे. गौंडरे येथे दोन शैक्षणिक संस्था, डीसीसी बँकेची शाखा तसेच सीना-कोळगाव प्रकल्प परिसर असल्याने या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व नागरिकांची ये-जा असते. आवाटी, सालसे, हिसरे, कोळगाव, निमगाव यांसह अनेक गावांतील नागरिक विविध कामांसाठी गौंडरे येथे येतात.
तसेच कुर्डूवाडी रेल्वे जंक्शनमार्गे सोलापूर, पुणे, मुंबई व इतर शहरांकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही बस अत्यंत महत्त्वाची मानली जाते. करमाळा येथे शिक्षण, आरोग्य सेवा व शासकीय कार्यालयीन कामांसाठी जाणाऱ्या नागरिकांनाही या सेवेचा मोठा फायदा होणार आहे.
बस सेवा पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, हा निर्णय विद्यार्थी, शेतकरी, कामगार व सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.
यावेळी नागरिकांच्या वतीने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आभार मानत, “नागरिकांनी एसटी बसचा अधिकाधिक वापर करून या सेवेचा लाभ घ्यावा,” असे आवाहन श्रीमंत औदुंबरराजे भोसले यांनी केले आहे.


