Monday, June 8, 2026
Latest:
करमाळा

करमाळ्यात १० किलो गांजासह युवक जेरबंद ३.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त; एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल

करमाळा, प्रतिनिधी : करमाळा शहरात अमली पदार्थांविरोधातील कारवाईत करमाळा पोलिसांना मोठे यश मिळाले असून, १० किलो २४८ ग्रॅम गांजासह एका युवकास अटक करण्यात आली आहे. या कारवाईत गांजा व दुचाकीसह एकूण ३ लाख ६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ६ जून २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास मौजे देवीचा माळ (ता. करमाळा) हद्दीतील कमलाभवानी मंदिराकडे जाणाऱ्या चौकात ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव गौरव उर्फ फंटया दिलीप दोशी (रा. गुजर गल्ली, करमाळा) असे आहे.
करमाळा पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन भारत गोसावी यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, साडेकर प्लॉटिंग परिसरात एक व्यक्ती मोटारसायकलवरून गांजा विक्रीसाठी घेऊन येणार आहे. या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन पोलिसांनी पंचांसह सापळा रचला.
साडेकर प्लॉटिंग परिसरात संशयित व्यक्ती दुचाकीसह थांबलेली दिसून आली. पोलिसांचे वाहन पाहताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून कमलाभवानी मंदिराकडे जाणाऱ्या चौकात त्याला पकडले.
पंचांसमक्ष आरोपीच्या ताब्यातील हिरो मेस्ट्रो स्कुटरची तपासणी करण्यात आली असता, स्कुटीच्या मध्यभागी ठेवलेल्या पांढऱ्या रंगाच्या पिशवीत गांजा आढळून आला. तपासणीत १० किलो २४८ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या गांजाची किंमत २ लाख ५६ हजार २०० रुपये असून, स्कुटीची किंमत ५० हजार रुपये असल्याने एकूण ३ लाख ६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन गोसावी यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक ५४०/२०२६ अन्वये एनडीपीएस अॅक्ट कलम ८(क), २०(ब)(II)(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक रणजीत माने, पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर तसेच अजित उबाळे, अर्जुन गोसावी, अमोल रंदील, चेतन पवार, रविराज गटकुळ व बापुसाहेब कोकाटे यांनी सहभाग घेतला.
अमली पदार्थांविरोधात करमाळा पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे परिसरात स्वागत होत असून, अवैध अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!