Tuesday, November 10, 2026
Latest:
Uncategorized

ऊसदर आणि अतिवृष्टी अनुदानासाठी १३ नोव्हेंबर रोजी करमाळ्यात शेतकऱ्यांची बैठक; आंदोलनाची दिशा ठरणार – राजाभाऊ कदम

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी शुक्रवार, दि. १३ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा परिषद शासकीय विश्रामगृह, करमाळा (कोर्टाशेजारी) येथे शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजाभाऊ कदम यांनी या बैठकीचे आयोजन केले आहे.
या बैठकीमध्ये प्रामुख्याने दोन महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार आहे.
१) कोल्हापूरप्रमाणे करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसदर मिळावा.
साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांप्रमाणे योग्य व न्याय्य ऊसदर द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळालाच पाहिजे. जोपर्यंत कारखाने कोल्हापूरप्रमाणे ऊसदर देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात येणार आहे.
२) सन २०२५ मधील अतिवृष्टी नुकसानभरपाईचा निधी तातडीने मिळावा.
सन २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या, शेतीचे मोठे नुकसान झाले. शासनाच्या वतीने नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे अनुदानाच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. तसेच नुकसानभरपाईची रक्कमही अंतिम करण्यात आल्याची माहिती आहे.
मात्र, अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईचा निधी जमा झालेला नाही. पंचनामे होऊन, लाभार्थ्यांची नावे निश्चित होऊन आणि निधीची रक्कम मंजूर होऊनही शेतकऱ्यांना पैसे मिळत नसतील, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची नुकसानभरपाई तातडीने मिळाली पाहिजे, अशी भूमिका या बैठकीत मांडण्यात येणार आहे.
तहसीलदारांना निवेदन देणार; आंदोलनाची दिशा ठरणार!
या बैठकीच्या दिवशीच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात तहसीलदार, करमाळा यांना निवेदन देण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या सर्वानुमते पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात येणार आहे.
ऊसदराचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आणि २०२५ मधील अतिवृष्टी नुकसानभरपाईचा निधी सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा ठाम निर्धार या बैठकीत करण्यात येणार आहे.
सर्व शेतकऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन
करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचा हा लढा असून, कोणत्याही एका व्यक्तीचा किंवा संघटनेचा हा प्रश्न नसून संपूर्ण शेतकरी वर्गाच्या न्याय्य हक्काचा प्रश्न आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी, अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आणि जमीन खरडून गेलेले शेतकरी यांनी मोठ्या संख्येने व वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजाभाऊ कदम यांनी केले आहे.
बैठकीचा तपशील
दिनांक : शुक्रवार, १३ नोव्हेंबर २०२६
वेळ : दुपारी १२ वाजता
स्थळ : जिल्हा परिषद शासकीय विश्रामगृह, करमाळा (कोर्टाशेजारी)
प्रमुख विषय : ऊसदर आणि २०२५ अतिवृष्टी नुकसानभरपाई.

error: Don\'t try to copy. Content is protected !!