आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर नेरले-गौंडरे रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात माजी सरपंच औदुंबरराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला यश नागरिकांत समाधानाचे वातावरण
करमाळा, प्रतिनिधी. नेरले ते गौंडरे या महत्त्वाच्या रस्त्याच्या रखडलेल्या डांबरीकरणाच्या कामाला अखेर सुरुवात झाली असून आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाला जाग आल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक व नेरलेचे माजी सरपंच श्रीमंत औदुंबरराजे भोसले यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.
नेरले ते गौंडरे रस्त्याचे खडीकरण व कच्चे डांबरीकरणाचे काम दोन वर्षांपूर्वी पूर्ण झाले होते. मात्र, अद्याप पक्के डांबरीकरण न झाल्याने रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली होती. अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता. या रस्त्यावर अनेक छोटे-मोठे अपघात घडले असून अनेक जण जखमी झाले आहेत. शालेय विद्यार्थ्यांनाही या रस्त्याचा मोठा त्रास सहन करावा लागला. काही विद्यार्थ्यांच्या सायकलींचे नुकसान झाले असून त्यांना सायकल डोक्यावर घेऊन प्रवास करण्याची वेळ आली होती.
नेरलेहून गौंडरेकडे जाणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. तसेच महाविद्यालयीन शिक्षणासाठी करमाळा, परांडा आणि बार्शीकडे ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही याच मार्गाचा आधार आहे. परांडा बाजारपेठ जवळ असल्याने या रस्त्याचे महत्त्व अधिक वाढते.
रस्त्याच्या कामास विलंब होत असल्याने माजी सरपंच औदुंबरराजे भोसले यांनी ३ जून २०२६ रोजी काम तात्काळ सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री पवार यांनी संबंधित ठेकेदाराला तातडीने काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार शुक्रवार, दि. १० जुलै २०२६ रोजी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली.
कामाच्या शुभारंभाचे पूजन तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री लक्ष्मण उर्फ बप्पासाहेब शेळके आणि पालक समिती सदस्य श्री सौदागर गवळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य श्री सुनील लोखंडे, माजी सरपंच अंकुश हंडाळ, माजी सरपंच काकासाहेब पाटील, आबा सावंत, सुग्रीव लोंढे, आजीनाथ लोंढे, आकाश शेळके, बजरंग शेळके यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी रस्त्यांच्या निकृष्ट कामांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील किल्ले, इमारती, रस्ते आणि राणी अहिल्यादेवींच्या काळातील मंदिरे, घाट आणि राजवाडे आजही सुस्थितीत आहेत; मात्र आजची कामे टक्केवारीच्या राजकारणामुळे एक वर्षदेखील टिकत नाहीत,” अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली. अंदाजपत्रकानुसार दर्जेदार आणि मजबूत काम करण्याच्या सूचना ठेकेदाराला देण्यात आल्या.
रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने नेरले व परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रसंगी माजी सरपंच श्रीमंत औदुंबरराजे भोसले यांनी आमदार संजयमामा शिंदे, जिल्हा परिषद गटनेत्या रश्मीदीदी बागल, युवा नेते दिग्विजय भैय्या बागल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री पवार तसेच तालुक्यातील सर्व पत्रकार बंधूंचे मनःपूर्वक आभार मानले.


