Friday, July 10, 2026
Latest:
Uncategorized

निंभोरे ग्रामपंचायतीचे  तहसीलदारांना निवेदन; दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडण्याची मागणी

करमाळा प्रतिनिधी : निंभोरे व परिसरात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी तातडीने निंभोरे पाणीपुरवठा विहिरीच्या पाझर तलावात सोडण्यात यावे, अशी मागणी निंभोरे ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच रविंद्र वळेकर यांनी तहसीलदार करमाळा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मौजे निंभोरे येथे पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई निर्माण झाली असून गावासाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्याचा प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. मात्र सध्या आषाढी वारी सुरू असून गावातून मोठ्या प्रमाणात दिंड्या व वारकरी मार्गक्रमण करत आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची गरज आणखी वाढली आहे.
विशेष म्हणजे, निंभोरे व परिसरात जवळपास तीन ते चार किलोमीटरच्या परिसरात टँकर भरण्यासाठी शासकीय अथवा खासगी पाणी स्रोत उपलब्ध नसल्याने टँकर मंजूर झाला तरी तो भरून आणण्याची मोठी अडचण निर्माण होणार आहे. परिणामी, पाणीटंचाईची समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी निंभोरे पाणीपुरवठा विहिरीच्या पाझर तलावात सोडण्यात यावे, अशी मागणी ग्रामपंचायतीने केली आहे. यामुळे निंभोरे गावासह वाडी-वस्त्या आणि परिसरातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनाच्या प्रती गटविकास अधिकारी, पंचायत समिती करमाळा, कार्यकारी अभियंता, सोलापूर पाटबंधारे विभाग, सोलापूर तसेच उपविभागीय अधिकारी, कुकडी डावा कालवा उपविभाग क्र. १२, करमाळा यांनाही देण्यात आल्या आहेत.
यावेळी निंभोरे ग्रामपंचायतीचे सरपंच रविंद्र वळेकर तसेच सामाजिक कार्यकर्ते महेश वाघमारे उपस्थित होते. निंभोरे व परिसरातील नागरिकांनी प्रशासनाने तातडीने दखल घेऊन दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडण्याची मागणी केली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!