Wednesday, July 29, 2026
Latest:
Uncategorized

संघर्ष, संघटन नेतृत्वाचा यशस्वी प्रवास गणेश चिवटे यांची भाजप जिल्हाध्यक्षपदी निवड कार्यकर्त्यापासून जिल्हाध्यक्षपदापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास करमाळ्यात समर्थकांचा जल्लोष

करमाळा प्रतिनिधी : तळागाळातील कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवत, पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी सातत्याने कार्यरत राहिलेले भाजपचे नेते गणेश भाऊ चिवटे यांची भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली. संघटनात्मक कार्यातील सातत्य, पक्षनिष्ठा आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याची शैली यामुळे गणेश चिवटे यांना जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे.
गणेश भाऊ चिवटे यांचा राजकीय प्रवास हा संघर्ष, मेहनत आणि संघटन कौशल्याचा आदर्श नमुना मानला जात आहे. युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास युवा सरचिटणीस, भाजप तालुकाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस आणि आता जिल्हाध्यक्ष या पदापर्यंत पोहोचला आहे. पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी त्यांनी निष्ठेने पार पाडत कार्यकर्त्यांमध्ये विश्वासाचे स्थान निर्माण केले.
भाजपची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविणे, ग्रामीण भागात पक्षाची संघटना मजबूत करणे आणि युवकांना पक्षाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गणेश चिवटे यांनी सातत्याने प्रयत्न केले. पदापेक्षा संघटनेला महत्त्व देत त्यांनी कार्यकर्त्यांशी सातत्याने संवाद ठेवला. गावागावातील कार्यकर्त्यांशी संपर्क साधून पक्षाच्या विस्तारासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
गणेश भाऊ चिवटे यांच्या राजकीय वाटचालीत पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या सहकार्यामुळे चिवटे यांनी पक्षातील विविध जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडत संघटनात्मक कामाला अधिक गती दिली. पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या कार्याची दखल घेत जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे.
गणेश चिवटे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातूनही आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. नगरसेवक म्हणून काम करताना त्यांनी करमाळा शहरातील विविध विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. बांधकाम समितीचे सभापती म्हणून जबाबदारी सांभाळताना रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले.
विकासकामांसाठी प्रशासनाशी समन्वय साधणे, नागरिकांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे ही त्यांची कार्यशैली राहिली आहे. करमाळा नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून विविध प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न स्थानिक पातळीवर चर्चेचा विषय ठरले.
जिल्हा सरचिटणीस म्हणून काम करताना त्यांनी जिल्ह्यातील विविध भागांतील कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवून भाजपची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी योगदान दिले. संघटन कौशल्य, नियोजन क्षमता आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची भूमिका यामुळे त्यांचे नेतृत्व पक्षात प्रभावी ठरले.
गणेश भाऊ चिवटे यांच्या जिल्हाध्यक्षपदी निवडीचे वृत्त समजताच करमाळा शहर व तालुक्यात त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. पेढ्यांचे वाटप करून कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. शहरासह तालुक्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गणेश चिवटे यांची जिल्हाध्यक्षपदी झालेली निवड भाजपसाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात पक्षसंघटना अधिक मजबूत होईल, नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल आणि पक्षाचा विस्तार अधिक व्यापक होईल, असा विश्वास भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.
नगरसेवक, बांधकाम समितीचे सभापती, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष, युवा सरचिटणीस, भाजप तालुकाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस आणि आता जिल्हाध्यक्ष असा गणेश भाऊ चिवटे यांचा प्रवास हा कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या यशाबद्दल भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!