दत्तकला इंटरनॅशनल स्कूलमध्ये मातृपूजनाने गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
करमाळा प्रतिनिधी
दत्तकला इंटरनॅशनल स्कूलच्या CBSE व SSC विभागातील विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीतील “माता हीच पहिली गुरु” या विचाराला उजाळा देत गुरुपौर्णिमेनिमित्त भावपूर्ण मातृपूजन सोहळ्याचे आयोजन केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. विद्यार्थ्यांनी आपल्या मातांचे औक्षण करून त्यांच्या चरणी पुष्प अर्पण करत कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी सादर केलेली गीते, भाषणे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमधून गुरु-शिष्य परंपरेचे तसेच आईच्या संस्कारांचे महत्त्व प्रभावीपणे मांडण्यात आले.
यावेळी संस्थेच्या सचिव सौ. माया रामदास झोळ यांचे पूजन त्यांचे सुपुत्र व संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक श्री. पृथ्वीराज रामदास झोळ यांच्या हस्ते करण्यात आले. हा प्रसंग उपस्थितांसाठी विशेष भावनिक आणि प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास मधुकर झोळ यांनी गुरुचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व विशद केले. “दत्तकला शिक्षण संस्थेत केवळ गुणवत्तापूर्ण शिक्षणच नव्हे, तर संस्कार, चारित्र्य आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. गुरु, माता-पिता आणि समाजाप्रती आदरभाव निर्माण करणे हीच खरी शिक्षणाची दिशा आहे,” असे त्यांनी अधोरेखित केले.
या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन SSC विभागाच्या प्राचार्या सौ. सिंधू यादव तसेच CBSE विभागाच्या प्राचार्या सौ. वृशाली बागुल यांनी केले. कार्यक्रमास संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी (CAO) डॉ. विशाल बाबर तसेच संस्थेच्या विविध विभागांचे प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे गुरुपौर्णिमा व मातृपूजनाचा हा संस्कारमय सोहळा अत्यंत भक्तिमय, प्रेरणादायी आणि संस्मरणीय वातावरणात संपन्न झाला.


