लोकशिक्षिका लीलाताई दिवेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सोलापुरात शहरस्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा ज्येष्ठ पत्रकार अभय दिवाणजी यांना ‘जीवनगौरव’; महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घघाटन
करमाळा प्रतिनिधी :
विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषेतील अभिव्यक्तीला व्यापक व्यासपीठ मिळावे, त्यांच्यातील वक्तृत्वकला, आत्मविश्वास आणि वैचारिक प्रगल्भता विकसित व्हावी, या उद्देशाने यशकल्याणी सेवाभावी संस्था, करमाळा, जिल्हा परिषद सोलापूरचा शिक्षण विभाग आणि सोलापूर इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सोलापूर शहरस्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा–२०२६’ आयोजित करण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या ज्येष्ठ विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या लोकशिक्षिका स्व. लीलाताई दिवेकर यांच्या सेवामय स्मृतींना समर्पित असलेली ही स्पर्धा शुक्रवार, दि. ३१ जुलै २०२६ रोजी दुपारी ८.३० वाजता जुळे सोलापूर येथील कै. विलासचंद्र मेहता हायस्कूलमध्ये होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे येथील शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे सदस्य सुरेश बाबू मंकणी हे राहणार आहेत. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.
याच सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार, ख्यातनाम संपादक आणि समाजाभिमुख व समस्यांच्या समाधानाचा मार्ग दाखविणाऱ्या पत्रकारितेचे समर्थ पुरस्कर्ते अभय दिवाणजी यांना त्यांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय पत्रकारिता आणि सामाजिक योगदानाबद्दल ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.
पत्रकारिता ही केवळ घटनांची नोंद करणारी व्यवस्था नसून समाजाच्या प्रश्नांचा वेध घेणारी, लोकभावनांना विधायक दिशा देणारी आणि व्यवस्थेला उत्तरदायी बनविणारी लोकशक्ती आहे. या मूल्याधिष्ठित पत्रकारितेचा सातत्याने पुरस्कार करणाऱ्या अभय दिवाणजी यांचा गौरव हा संवेदनशील आणि विधायक पत्रकारितेच्या परंपरेचाच सन्मान ठरणार आहे.
या कार्यक्रमास सोलापूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. गणेश करे-पाटील,शिक्षणाधिकारी मल्हारी माने, मुख्य लेखापरीक्षक सदानंद वाघमोडे, मुख्य लेखापाल व नियंत्रक अधिकारी डॉ. रत्नराज जवळगीकर, कै. विलासचंद्र मोतीचंद मेहता हायस्कूलच्या प्राचार्या श्रुती बागेवाडी, माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप, उत्तर सोलापूरचे गटविकास अधिकारी मनोज राऊत, दक्षिण सोलापूरचे गटविकास अधिकारी राजाराम भोंग आणि जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी केदार शेख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तसेच महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजी माने, सोलापूर जिल्हा इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. बाळकृष्ण लवंड आणि ‘डेल्टास’चे जिल्हा समन्वयक प्रा. गुरुनाथ मुचंडे यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे.
सोलापूर सिटी इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शहाजी ठोंबरे आणि सचिव धनश्री विधाते यांच्या संयोजनातून हा शैक्षणिक उपक्रम साकारत आहे.
इंग्रजी ही केवळ परीक्षेतील गुणांची भाषा न राहता संवाद, संशोधन, ज्ञान आणि जागतिक संधींची भाषा बनली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विचार करण्याची, तो विचार आत्मविश्वासाने मांडण्याची आणि जागतिक पातळीवरील संवादासाठी स्वतःला सक्षम बनविण्याची संधी देणारी ही वक्तृत्व स्पर्धा सोलापूरच्या शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे.


