करमाळा–आदमापूर एस.टी. सेवा सुरू भक्तांची मोठी सोय डेपो मॅनेजर प्रमोद शिंदे यांचा सत्कार; मनसे तालुकाध्यक्ष संजय घोलप यांच्या पुढाकाराचे कौतुक
करमाळा प्रतिनिधी
करमाळा आगारातून करमाळा ते आदमापूर (बाळूमामांचे स्थान) नवीन एस.टी. बससेवा सुरू झाल्याने बाळूमामा भक्तांसह प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. या बससेवेबद्दल धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष मा. संजय (बापू) घोलप यांच्या पुढाकाराने एस.टी. महामंडळाचे डेपो मॅनेजर मा. प्रमोद शिंदे यांचा फेटा, शाल व पुष्पगुच्छ देऊन कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला.
आदमापूर येथे बाळूमामांच्या दर्शनासाठी करमाळा तालुक्यासह परिसरातून मोठ्या संख्येने भाविक जात असतात. थेट बससेवा नसल्याने अनेक प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता. त्यामुळे वेळ आणि प्रवासाचा खर्च वाढत होता. ही अडचण लक्षात घेऊन करमाळा–आदमापूर बससेवा सुरू करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला.
या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत करमाळा आगाराने नवीन बससेवा सुरू केली. त्यामुळे भाविकांना सुरक्षित, सोयीस्कर आणि किफायतशीर सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि नियमितपणे आदमापूरला जाणाऱ्या भक्तांसाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे.
बससेवा सुरू करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल प्रमोद शिंदे यांचे आभार व्यक्त करून त्यांचा सत्कार करण्यात आला. करमाळा–आदमापूर बससेवा ही भाविकांच्या श्रद्धास्थानाशी जोडणारी महत्त्वाची सुविधा ठरली असून, या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. भविष्यात प्रवाशांचा प्रतिसाद पाहून या मार्गावरील फेऱ्यांमध्ये वाढ करावी, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली.


