शुन्यातून अल्पावधीतच विश्व निर्माण करणाऱ्या ग्रामीण भागातील कर्तृत्ववान अष्टपैलू व्यक्तिमत्त्व भरत भाऊ आवताडे यांची यशोगाथा वाढदिवस विशेष लेख – विवेक शं येवले करमाळा
भरत आवताडे हे नाव गेल्या काही वर्षांपूर्वी करमाळा तालुक्यात फारसे कुणालाही परिचित नव्हते.पण आज हे नाव एक यशस्वी उद्योजक,तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि पहिल्याच निवडणुकीत फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या जि.प.,पं.स.निवडणुकीत हिसरे गणातून निवडून आलेले पंचायत समिती सदस्य म्हणून सर्वपरिचित झालेलं आहे.विशेष म्हणजे या यशोगाथेचा प्रवास हा फारसा दीर्घ काळाचा नाही हे या यशातले महत्वाचे वैशिष्ठ आहे.
२६ जुलै १९८० चा जन्म असलेल्या भरतभाऊंचे मूळ गाव फिसरे पण त्यांचा जन्म झाला पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथे.कारण गावात राहायला घर नव्हते ना शिवारात शेत ! तालुक्याचा पूर्व भाग हा त्यावेळी तसा ड्राय भाग.त्यामुळं ज्या गावी शेतातलं काम लागेल त्या – त्या गावी आईवडिलांची भटकंती सुरू असायची.अशाच भटकंतीत भरतभाऊचा जन्म कोर्टी येथे झाला.त्यांच्या जन्मानंतरही त्यांच्या कुटुंबाची अशाच पद्धतीने काम लागेल तिथं पाल टाकून राहायचं…अशा पद्धतीने हे आवताडे कुटुंब नंतर तालुक्यातील बॅकवॉटर परिसरात वांगी,बिटरगाव, चिखलठाण असे स्थलांतरित होत राहिले.चिखलठाण इथं रहात असताना तिथल्या (तेव्हाचे नाव असलेल्या) न्यू इंग्लिश स्कूल या हायस्कूलमध्ये शिकत असलेल्या भरतभाऊने १० ची परीक्षा दिली.त्यावेळी पालवजा घरात अभ्यास करणे शक्य नसल्याने त्यावेळी चिखलठाण येथे असलेल्या तानाजी चव्हाण यांच्या श्रीदत्त फोटो स्टुडिओ मध्ये (त्यावेळी बहुदा एकमेव असलेल्या) रात्री अभ्यासासाठी मुक्काम करण्याची परवानगी चव्हाण यांनी दिली आणि त्या बदल्यात भरतभाऊ हे सकाळी त्यांच्या स्टुडिओची झाडलोट,साफसफाई आदी कामे स्वतःहून करायला लागले.याच काळात चव्हाण यांच्या सहवासामुळे भरतभाऊला फोटोग्राफीची आवड निर्माण झाली,त्यांनी ती कला शिकूनही घेतली.पण…
दोन मोठ्या बहिणींचे त्या भटकंतीच्या काळातच लग्न होऊन त्या वांगी परिसरात सुस्थळी गेलेल्या आणि धाकटी बहीण जवळपास आठनऊ वर्षांनी लहान या परिस्थितीत १९९९ साली आईचे निधन झाले.त्यामुळं वडील व लहान बहिणीच्या सोयीसाठी भरतभाऊला अवघ्या विसाव्या वर्षी चतुर्भुज व्हावं लागलं.त्या दरम्यान कुटुंब मूळ फिसरे गावी विसावलेलं.त्याच काळात लग्नाआधी आणि नंतरही जवळपास तीन वर्षे भरतभाऊने कल्याणी स्टील,मुंढवा पुणे या कंपनीच्या कँटिनमध्ये वेटर म्हणून काम केलं.पण एक तर लग्न झालेलं,शिवाय वडील व लहान बहिणीची जबाबदारी यामुळं त्यांनी पुन्हा बिटरगाव – वांगी परिसरात पुन्हा शेतात मोलमजुरी केली.याच काळात आधी शिकलेल्या फोटोग्राफीचा व्यवसाय करावा या इच्छेने उचल खाल्ली पण…त्यासाठी लागणारा प्रोफेशनल कॅमेरा अगदी सेकंडहँड घ्यायचा म्हंटले तरी किमान १० हजार हवे,ते कसे उभे करायचे ? हा यक्षप्रश्न समोर होता.
अर्थात इच्छा तिथं मार्ग ! या उक्तीनुसार जवळ साठलेले,काही उसने तर २ हजार व्याजाने अशी बेरीज मारून कॅमेरा खरेदी करून बॅकवॉटर परिसरात फोटोग्राफीचा ऑर्डरनुसार फिरता व्यवसाय सुरू केला.त्या धंद्यात २००३ ते ०६ या दरम्यान बऱ्यापैकी लौकिक आणि पैसाही मिळाला.हा व्यवसाय सुरू असतानाच चुलत्यांच्या इच्छे व गरजेसाठी त्यांच्या त्यांच्या श्री दत्त एंटरप्रायजेस या फर्ममध्ये २००६ ते २०१३ या दरम्यान सुपरवायझर म्हणून १० हजार पगारावर नोकरी केली.देशात,राज्यात उभारल्या जाणाऱ्या राष्ट्रीय,राज्य महामार्गांच्या कामाचा ठेका घेणाऱ्या कंपन्यांचे सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून रस्ता उभारणीसाठी संपादित केलेल्या जमिनीतील झाडे कापणे,वाहून नेणे,महामार्गाभोवती नवीन झाडे लावून त्यांचे संवर्धन करणे,रस्त्याच्या दोन्ही बाजूची पिचिंगची कामे करणे आदी कामे या फर्मकडून केली जायची.भरतभाऊने ही नोकरी करत असताना ही कामे कशी करायची,ही कामे कशी मिळवायची…हे सगळे तंत्र अनुभवातून आत्मसात केलं.
आणि भरतभाऊंनी २०१३ साली स्वतःच्या गुरुदत्त एंटरप्रायजेस या फर्मची स्थापना करून याच व्यवसायात पदार्पण करून सुरुवातीस संघर्ष करून कंपन्यांकडून छोटी,मोठी कामे मिळवण्यास सुरुवात केली.२०१७ मध्ये सोलापूर – संभाजीनगर
या हायवेच्या बांधणीचे काम करणाऱ्या आय.आर.बी.कंपनीकडून ४० किलोमीटर रस्ता मुरुमीकरण करण्याचे काम मिळाले आणि या कामातून भाऊंची फर्म फॉर्ममध्ये आली,तिथून पुढे खऱ्या अर्थाने व्यावसायिक घोडदौड सुरू झाली.
या व्यवसायासाठी लागणारे ग्रेडर,डंपर्स,प्रोकलेन्स,रोडरोर्लस,वॅाटर टँकर्स,डिझेल टँकर,कँपर आदी यंत्रसामुग्री,वाहने भरतभाऊच्या फर्मने स्वतःच्या मालकीची खरेदी केली.स्वतःच्या या आवश्यक यंत्रसामुग्री व वाहनांमुळे व्यवसाय आणखी जोमाने वाढत गेला.आजमितीला मोठी उलाढाल असणाऱ्या या व्यवसायाच्या माध्यमातून अनेक जणांना रोजगार मिळाला आहे.
२०१३ ला सुरू केलेल्या या व्यवसायातून स्वतःची प्रगती करत असतानाच उपजतच असलेल्या सामाजिक कार्याची आवड व सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून भरतभाऊंनी राजकारणातून समाजकारण या हेतूने २०१६ मध्ये शिवसेना तालुका उपप्रमुख आणि २०१८ पासून जिल्हा उपप्रमुख या पदांच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात प्रवेश केला.पुढे २०२१ साली तत्कालीन आमदार संजयमामा शिंदे यांच्या सर्वसमावेशक,व्हिजनशील नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय भरतभाऊंनी घेतला.त्यांच्यातील संघटन कौशल्य,सामाजिक प्रश्नांची असलेली जाण,शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी असलेली तळमळ हे गुण लक्षात घेऊन त्यांना २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस(अजितदादा) पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी संधी दिली.या पदाच्या माध्यमातून भरतभाऊंनी तालुक्यात पक्षसंगठन जोमाने वाढविण्याच्या प्रयत्नांसोबतच विविध सामाजिक उपक्रम,कार्यक्रम वेळोवेळी मामांच्या नेतृत्वाखाली राबविले,आजही राबवित आहेत.आणि भाऊ नुकत्याच झालेल्या निवडणुकीत हिसरे गणातून पंचायत समिती सदस्यपदी उल्लेखनीय बहुमतांनी विजयी झालेले आहेत.
फिसरे या मूळ वाडवडीलांच्या गावात घरदार,शेती नसल्यामुळे लहानपणापासून “विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर”अशा पद्धतीचे कुटुंबासह विस्थापिताचे आयुष्य जगलेल्या,कसलीही व्यावसायिक,सामाजिक,राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या भरतभाऊंनी आपल्या अंगभूत गुणांनी सर्वच क्षेत्रात अवघ्या पंधरावीस वर्षात मिळविलेले यश हे आजच्या तरुणाईसाठी,ग्रामीण भागातील तरुणांसाठी खरंच प्रेरणादायी आहे हे नक्की !
ज्या स्वतःच्या गावात,स्वतःच काहीच नव्हतं, त्याच फिसरे गावच्या शिवारात त्यांची २० एकर जमीन,बंगला,२ एकरात उभारलेले फार्म हाऊस असे सगळं वैभव त्यांच्या कार्यकर्तृत्वातून उभे राहिलेलं आहे. स्वकर्तृत्वाच्या बळावर अल्पावधीत यशाचे शिखर गाठलेल्या भाऊंचे पाय मात्र कायम जमिनीवर असतात हे सर्वाधिक महत्त्वाचे! वडील,पत्नी,दोन मुले,एक सून असा सुखी परिवार असलेले भाऊ अवघ्या त्रेचाळीसाव्या वर्षी एका नातीचे आजोबा झालेले आहेत.अयोध्या ही नात आता दोन वर्षांची आहे ! भाऊंचा थोरला मुलगा आकाश हा गुरुदत्त ज्वेलर्स या व्यवसायाची जबाबदारी करमाळा या ठिकाणी सांभाळतो तर धाकटा मुलगा महेश हा त्यांच्या व्यवसायाच्या साईट्स सांभाळतो. भरत भाऊंच्या या यशस्वी वाटचालीमध्ये त्यांच्या धर्मपत्नी सौ.स्वातीताई यांचा मोलाचा सहभाग आहे.
त्यांच्याशी बोलताना त्यांच्या उरात सदैव असलेली खंत जाणवली…आज माझी आई हवी होती.जिने तिच्या आयुष्यात फक्त खस्ताच खाल्ल्या,ती आज हे दिवस पहायला हवी होती.सुदैवाने आजही वडील आजही ठणठणीत आहेत,त्यांच्यातच मी माझ्या आईला बघतो !
भरतभाऊंच्या २६ जुलै रोजी असलेल्या वाढदिवसानिमित मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा…पुढील काळात त्यांची सर्वांगाने वृद्धी व्हावी हीच मनोमन शुभकामना !
*- विवेक शं.येवले, करमाळा*
*जि.सोलापूर*


