ग्रामपंचायत प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी कार्यक्रम स्थगित; सुजित बागल यांच्या मागणीला यश राज्य निवडणूक आयोगाचे आदेश
करमाळा प्रतिनिधी
राज्यातील १५,१५५ ग्रामपंचायतींच्या आगामी निवडणुकांसाठी २४ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध होणारा प्रारूप मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने तात्पुरता स्थगित केला आहे. आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी याबाबत आदेश जारी करून तालुका व जिल्हास्तरीय निवडणूक अधिकाऱ्यांना प्रारूप मतदार यादी सध्या प्रसिद्ध करू नये तसेच सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे कळविण्यात येईल, अशा सूचना दिल्या आहेत.
या निर्णयामुळे करमाळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे तालुका कार्याध्यक्ष सुजित शिवाजी बागल यांनी केलेल्या मागणीला मोठे यश मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
सुजित बागल यांनी राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र तसेच जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्याकडे निवेदन देऊन ग्रामपंचायत निवडणुकांसाठी जाहीर करण्यात आलेला मतदार यादीचा कार्यक्रम वस्तुस्थितीशी विसंगत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. भारत निवडणूक आयोगाकडून राज्यभर मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण सुरू असताना घाईघाईने प्रारूप व अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्यास अनेक नवमतदार, विशेषतः १८ वर्षे पूर्ण केलेले तरुण, मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला होता.
सदर निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकारी, सोलापूर यांनी ही बाब राज्य निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर आयोगाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नव्या मतदार नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होऊन सखोल पुनरीक्षणानंतरच सुधारित मतदार याद्या प्रसिद्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या निर्णयामुळे राज्यातील हजारो नवमतदारांना दिलासा मिळणार असून ग्रामपंचायत निवडणुकीतील मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शक, सर्वसमावेशक आणि लोकशाही मूल्यांना पूरक ठरणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने सुधारित मतदार यादीचा कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले असून, सुजित शिवाजी बागल यांच्या पाठपुराव्यामुळे ही सकारात्मक घडामोड घडल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या या प्रयत्नाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


