Tuesday, July 7, 2026
Latest:
Uncategorized

विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी औदुंबरराजे भोसलेचा लढा यशस्वी शेतीची रात्रीची वीज सुरू विद्यार्थी-पालकांच्या आंदोलनाला मिळाले यश शेतकरी विद्यार्थी पालकांमध्ये आनंदाचे वातावरण


करमाळा  प्रतिनिधी
शेतीसाठी रात्रीचा वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी विद्यार्थी, पालक व शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनाला यश आले असून महावितरणने रात्रीचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू केला आहे. ही माहिती नेरलेचे माजी सरपंच श्रीमंत औदुंबरराजे भोसले यांनी दिली.
ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक शेतात वास्तव्यास असल्याने सायंकाळी सहा ते रात्री दहा या कालावधीत वीजपुरवठा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर गंभीर परिणाम होत होता. त्याचबरोबर शेतकऱ्यांना जनावरांची देखभाल, दूध काढणे, स्वयंपाक तसेच इतर शेतीची कामे अंधारात करावी लागत होती. त्यामुळे सर्प व वन्य प्राण्यांचा धोका वाढल्याचेही भोसले यांनी सांगितले.
या प्रश्नाबाबत तहसीलदार करमाळा तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले होते. त्यानंतरही प्रश्न मार्गी न लागल्याने ६ जुलै रोजी करमाळा येथे शेकडो विद्यार्थी, पालक आणि शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. आंदोलनादरम्यान बार्शी येथील कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क साधण्यात आला. विद्यार्थी व शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन त्याच दिवशी रात्रीपासून वीजपुरवठा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे भोसले यांनी सांगितले.
वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर शेतकरी, विद्यार्थी व पालकांनी पेढे वाटून आणि फटाके फोडून आनंद व्यक्त केला. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल वातावरण मिळणार असून शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाल्याचे भोसले यांनी नमूद केले.
या आंदोलनाला प्रसिद्धी देणाऱ्या तालुक्यातील सर्व पत्रकारांचे तसेच सकारात्मक भूमिका घेत वीजपुरवठा सुरू करणाऱ्या महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. भविष्यात शेतीची रात्रीची वीज पुन्हा बंद करू नये, तसेच तालुक्यात कुठेही वीजपुरवठा खंडित झाल्यास नागरिकांनी तत्काळ महावितरणशी संपर्क साधावा, असे आवाहनही औदुंबरराजे भोसले यांनी केले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!