Uncategorized

निंभोरे ग्रामसभेत विकासाचा ध्यास; योजनांवर सविस्तर मंथन घरकुलासह महिला, दिव्यांग व ग्रामविकास योजनांना प्राधान्य

करमाळा प्रतिनिधी
निंभोरे ग्रामपंचायतीची ग्रामसभा सोमवार, दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी सरपंच रविदादा वळेकर यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. ग्रामसभेत विविध वैयक्तिक लाभाच्या योजना, घरकुल योजना, ग्रामविकास आराखडा, फळबाग लागवड तसेच गावातील विविध विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांच्या सहभागातून गावाच्या सर्वांगीण विकासाचे नियोजन करण्यावर ग्रामसभेत भर देण्यात आला.
सरपंच रविदादा वळेकर यांनी ग्रामस्थांना विविध शासकीय योजनांची माहिती देताना मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना, महिला व बालकल्याण विभाग तसेच जिल्हा परिषद सोलापूरच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या पिठाची गिरणी, पिकोफॉल मशीन, कांडप यंत्र आदी योजनांची माहिती दिली. इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलींसाठी सायकल योजनेचे अर्ज, तसेच दहावी उत्तीर्ण महिलांसाठी संगणक प्रशिक्षण योजनेचाही लाभ पात्र लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
दिव्यांग बांधवांसाठी असलेल्या योजनांवरही ग्रामसभेत विशेष चर्चा झाली. शेळीपालन गटखरेदी, झेरॉक्स मशीन, ई-बाईक, ८० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या पाल्यांच्या पालकांना मदत व अनुदान, अन्न व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, दिव्यांग स्वयंसहायता समूहांना व्यवसायासाठी अर्थसाहाय्य तसेच पिठाची गिरणी यांसारख्या योजनांची माहिती देण्यात आली. पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत झालेल्या सर्वेक्षणातील लाभार्थ्यांची यादी ग्रामसभेत वाचून दाखविण्यात आली. या यादीला ग्रामसभेची मंजुरी घेण्यात आली. तसेच आजपर्यंत घरकुलाचा लाभ मिळालेला नसलेल्या पात्र लाभार्थ्यांची नावे यादीत समाविष्ट करण्याबाबतही निर्णय घेण्यात आला. त्यामुळे घरकुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
विकसित भारत रोजगाराची हमी व आजीविका अभियान ग्रामीण (V.B.G. RAMG) अंतर्गत गावविकास आराखडा तयार करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. गावाच्या गरजा लक्षात घेऊन भविष्यातील विकासकामांचे नियोजन करण्याबरोबरच फळबाग लागवडीसाठी पात्र लाभार्थी निवडण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला.
पाणी फाउंडेशन आयोजित ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धा २०१९ मध्ये निंभोरे गावाने तालुकास्तरीय प्रथम क्रमांक मिळविला होता. या स्पर्धेतील पारितोषिकाची शिल्लक रक्कम उपलब्ध असून, मार्गदर्शक सूचनांनुसार या निधीतून गावाच्या विकासासाठी आवश्यक कामे करण्याचे ग्रामसभेत ठरविण्यात आले.
याशिवाय गावातील अतिक्रमणाचे प्रश्न, ग्रामविकासाशी संबंधित विविध कामे, आगामी विकासाचे नियोजन तसेच आयत्या वेळी उपस्थित करण्यात आलेल्या विषयांवरही ग्रामस्थांनी चर्चा केली. गावाच्या मूलभूत गरजा आणि भविष्यातील विकासकामांना प्राधान्य देण्याची भूमिका ग्रामसभेत व्यक्त करण्यात आली.
ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच रविदादा वळेकर होते. ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या बहिष्कारामुळे लिपिक दिलीप मुळे यांनी सचिवपदाची जबाबदारी पार पाडली. यावेळी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, युवक, आजी-माजी पदाधिकारी, कृषी सहाय्यक अधिकारी महेश कोकरे यांच्यासह विविध शासकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसभेत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे निंभोरेच्या आगामी ग्रामविकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

error: Don\'t try to copy. Content is protected !!