ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. जामखेड तालुकास्तरीय स्पर्धेत बुद्धिबळ व कुस्ती या दोन्ही क्रीडा प्रकारांत संस्थेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवत घवघवीत यश संपादन केले. इयत्ता १२ वीचा विद्यार्थी प्रतीक नामदे याने जामखेड तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत आपल्या बुद्धिमत्ता, एकाग्रता, संयम आणि उत्कृष्ट रणनीतीचे दर्शन घडवले. विविध डावांमध्ये प्रभावी खेळ करत त्याने स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले.तर इयत्ता १० वीचा विद्यार्थी राम धनंजय सरडे याने ५५ किलो वजन गटातील कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत दमदार कामगिरी केली. रामने आपल्या कौशल्यपूर्ण डावपेचांच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर मात करत तालुक्यात अव्वल स्थान मिळवले.बुद्धिबळासारख्या बौद्धिक खेळापासून ते कुस्तीसारख्या शारीरिक सामर्थ्याच्या खेळापर्यंत विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला दिले जाणारे महत्त्व अधोरेखित करणारे आहे.या दुहेरी यशाबद्दल ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक व संचालक प्रा. डॉ. महेश निकत सर, शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थ्यांनी प्रतीक नामदे आणि राम सरडे यांचे अभिनंदन केले.दोन्ही विद्यार्थ्यांच्या या यशामुळे संस्थेच्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध करावी, यासाठी ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट सातत्याने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत आहे.”


