करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन
करमाळा : प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १९ ते २१ सप्टेंबर २०२६ या कालावधीत येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विजयश्री सभागृहात दररोज सायंकाळी सहा वाजता ही व्याख्यानमाला रंगणार आहे. महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक, कवी, लेखक व व्याख्यात्यांची वैचारिक मेजवानी करमाळेकरांना या निमित्ताने अनुभवता येणार आहे.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता त्याला सामाजिक, सांस्कृतिक व वैचारिक उपक्रमांची जोड देण्याचा प्रयत्न सर्वोदय प्रतिष्ठानकडून सातत्याने केला जात आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून गेल्या काही वर्षांपासून प्रतिष्ठानच्या वतीने गणेशोत्सवाच्या काळात बौद्धिक व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. या माध्यमातून विद्यार्थी, युवक, पालक, शिक्षक तसेच साहित्यप्रेमी रसिकांना विविध विषयांवर विचार ऐकण्याची संधी मिळते.
व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी शनिवार, दि. १९ सप्टेंबर रोजी मुंबई येथील प्रसिद्ध कवी, लेखक व चित्रपट कथालेखक अरविंद जगताप यांचे ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. आपल्या साहित्यिक लेखनातून सामाजिक वास्तव आणि मानवी भावविश्व मांडणारे जगताप यांच्या व्याख्यानाची रसिकांना उत्सुकता आहे.
रविवार, दि. २० सप्टेंबर रोजी पुणे येथील प्रसिद्ध लेखक देवा झिंजाड यांचे ‘एक भाकर तीन चुली’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. तर व्याख्यानमालेच्या समारोपाच्या दिवशी सोमवार, दि. २१ सप्टेंबर रोजी माजलगाव येथील प्रसिद्ध साहित्यिक व कवी प्रभाकर साळेगावकर हे ‘क्रिएटिव्हिटी टू पॉझिटिव्हिटी’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
गणेशोत्सवाच्या आनंदाला वैचारिक चिंतनाची जोड देणाऱ्या या उपक्रमामुळे करमाळ्यातील नागरिकांना नामवंत वक्त्यांचे विचार प्रत्यक्ष ऐकण्याची संधी मिळणार आहे. विशेषतः विद्यार्थी व युवकांनी या व्याख्यानमालेचा लाभ घेऊन विचारांची नवी दिशा आत्मसात करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या तीनही दिवसांच्या व्याख्यानांना करमाळ्यातील विद्यार्थी, पालक, शिक्षक, साहित्यप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते व सर्व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सर्वोदय प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक चव्हाण व सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.


