Thursday, September 17, 2026
Latest:
Uncategorized

गणेशोत्सव सामाजिक उपक्रमाने साजरा करण्याचा गजानन सोशल ॲड स्पोर्ट्स क्लबचा आदर्श घ्यावा -पोलीस निरीक्षक रणजीत माने* *आरोग्य तपासणी शिबिरात २१३ जणांची तपासणी, १०७ जणांचे रक्तदान

करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची जोड देणे गरजेचे आहे. गणेशोत्सव मंडळांनी आरोग्य, रक्तदान, सामाजिक मदत, जनजागृती यांसारखे समाजोपयोगी उपक्रम राबवावेत. गजानन सोशल ॲड स्पोर्ट्स क्लबने गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचा इतर गणेशोत्सव मंडळांनी आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी केले.
गजानन सोशल ॲड स्पोर्ट्स क्लबच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. तब्बल २१३ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली, तर १०७ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले, गणेशोत्सवाच्या काळात विविध मंडळांकडून धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र, त्यासोबत समाजाच्या प्रत्यक्ष गरजा लक्षात घेऊन आरोग्य तपासणी, रक्तदान, गरजू व्यक्तींना मदत आणि सामाजिक जनजागृतीचे उपक्रम राबविल्यास उत्सवाला विधायक स्वरूप प्राप्त होते. गजानन सोशल ॲड स्पोर्ट्स क्लबने अशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून समाजापुढे चांगला उपक्रम ठेवला आहे. इतर मंडळांनीही या उपक्रमाचा आदर्श घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
गजानन सोशल ॲड स्पोर्ट्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष व नगरसेवक प्रशांत ढाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या गणेशोत्सवात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. शिबिरात २१३ नागरिकांची विविध प्रकारची आरोग्य तपासणी करण्यात आली. नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले तसेच नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्वही सांगण्यात आले.
रक्तदान शिबिरालाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १०७ रक्तदात्यांनी रक्तदान करून गरजू रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. रक्तदान हे अनेकांचे प्राण वाचविण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याने गणेशोत्सवाच्या माध्यमातून रक्तदानासारखा जीवनदायी उपक्रम राबविण्यात आल्याचे विशेष कौतुक करण्यात आले.
या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष अमोदशेठ संचेती, प्रदीपभाऊ ढाळे, शौकत चाचा दारूवाले, नानासाहेब माळवे, प्रकाशशेठ बलदोटा, समीरभाई बागवान, चेतन ढाळे, अमित बुद्रुक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शिबिरासाठी डॉ. सुहास कुलकर्णी तसेच ॲड. सुहास मोरे यांचे सहकार्य लाभले.
गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून धार्मिक उत्सवाबरोबरच सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. आरोग्य तपासणी आणि रक्तदान या दोन्ही उपक्रमांना मिळालेला प्रतिसाद पाहता नागरिकांमध्येही समाजोपयोगी कार्याबाबत सकारात्मक भावना असल्याचे दिसून आले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष शशांक ढाळे, उपाध्यक्ष शंतनु कुलकर्णी, सुयश विभुते, खजिनदार साईराज घाडगे, सचिव आशिष कांबळे, सहसचिव यश देवी, कार्याध्यक्ष उत्कर्ष पवार, मिरवणूक प्रमुख संकेत जगताप आणि आरास प्रमुख सुजल लुंगारे यांनी विशेष परिश्रम घेतले.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांची परंपरा निर्माण करण्याचा प्रयत्न गजानन सोशल ॲड स्पोर्ट्स क्लबने केला असून, आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराच्या माध्यमातून ‘उत्सवातून सेवा’ हा संदेश देण्यात आला. अशा समाजोपयोगी उपक्रमांमुळे गजानन सोशल ॲड स्पोर्ट्स क्लबच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे

error: Don\'t try to copy. Content is protected !!