Thursday, September 17, 2026
Latest:
Uncategorized

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी
राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी होत्या. शाळा सुरू करण्यासाठी भव्य इमारत नव्हती, पुरेशा सुविधा नव्हत्या; केवळ दोन-तीन रिकामे वाडे एवढीच साधने होती. मात्र, परिस्थितीपुढे हार न मानता शिक्षणाचे मोठे स्वप्न उराशी बाळगून साखरे सरांनी श्री राजेश्वर विद्यालयाची स्थापना केली. त्यांच्या जिद्दीतून उभ्या राहिलेल्या या ज्ञानमंदिराने राजुरीच्या अनेक पिढ्यांना घडविले. शाळेची भव्य इमारत नव्हे, तर शिक्षकांची तळमळ, जिद्द आणि विद्यार्थ्यांना घडविण्याची ताकद महत्त्वाची असते, हे साखरे सरांनी सिद्ध केले, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक, वक्ते व कवी प्रा. डॉ. राजेंद्र दास यांनी केले.
श्री राजेश्वर विद्यालयाचे संस्थापक व पहिले मुख्याध्यापक स्व. सुखदेव साखरे सर यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त तसेच त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या ‘स्व. सुखदेव साखरे सर आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार’ वितरण सोहळ्यात प्रा. डॉ. दास बोलत होते.
यावेळी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी संचलित महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या कविता दादाराव धावणे यांना प्रा. डॉ. राजेंद्र दास यांच्या हस्ते आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप ११ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे होते.
प्रा. डॉ. दास यांनी स्व. साखरे सरांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, एखादी शाळा मोठी होण्यासाठी केवळ मोठी इमारत पुरेशी नसते. विद्यार्थ्यांना घडविण्याची शिक्षकांची तळमळ आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी महत्त्वाची असते. प्रतिकूल परिस्थितीतही साखरे सरांनी शिक्षणाची वाट धरली आणि त्यातून राजुरीच्या शैक्षणिक वाटचालीला नवी दिशा मिळाली. त्यांच्या कार्यातून ग्रामीण भागात शिक्षणाची चळवळ उभी राहिली.
बदलत्या शिक्षणव्यवस्थेवर भाष्य करताना प्रा. डॉ. दास यांनी शिक्षणाच्या वाढत्या व्यापारीकरणाबाबतही चिंता व्यक्त केली. मोठमोठ्या इमारती, वसतिगृहे, स्कूल बस तसेच पुस्तके, वह्या, दप्तर आदींच्या माध्यमातून शिक्षणाभोवती व्यावसायिक वातावरण निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षणाचा खरा उद्देश विद्यार्थ्यांना केवळ गुण मिळवून देणे नसून त्यांच्यात संस्कार, मूल्ये आणि सामाजिक जाण निर्माण करणे हा आहे. मातृभाषेच्या माध्यमातूनही दर्जेदार शिक्षण आणि संस्कार प्रभावीपणे देता येतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी महाराष्ट्र विद्यालय, बार्शीच्या शैक्षणिक कार्याचाही गौरव करण्यात आला. विद्यालयात सुमारे ४ हजार ५०० विद्यार्थी आणि १७५ कर्मचारी असून दोन सत्रांमध्ये शाळेचे कामकाज चालते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक, सामाजिक व सर्जनशील उपक्रम राबविले जातात. मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्यासह विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या उपक्रमांची माहिती पालकांपर्यंत पोहोचविली जाते. या शैक्षणिक कार्याची दखल घेत यावर्षी महाराष्ट्र शासनाने या विद्यालयाचा राज्यातील उत्तम शाळांमध्ये गौरव केल्याचे यावेळी सांगण्यात आले.
स्व. सुखदेव साखरे सरांचे शैक्षणिक कार्य पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावे तसेच शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मुख्याध्यापकांचा सन्मान व्हावा, या उद्देशाने त्यांचे माजी विद्यार्थी तथा पुरस्कार संयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चौधरी यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरू करण्यात आला. यंदा पुरस्काराचे दुसरे वर्ष होते.
कार्यक्रमास प्राचार्या कविता धावणे, प्रा. दिलीपराव मोहिते, विद्या विकास मंडळ करमाळ्याचे सचिव विलासराव घुमरे, मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल, महाराष्ट्र विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, वारकरी, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी तसेच साखरे कुटुंबीय उपस्थित होते.
पुरस्कार संयोजन समितीमध्ये तुकाराम जाधव (विक्रीकर अधिकारी, ठाणे), सतीश मोरे (स्टडी सर्कल, सोलापूर), प्रवीण साखरे (उद्योजक, पुणे), देविदास सारंगकर (कृषी अधिकारी, बारामती), नानासाहेब साखरे (कृषी अधिकारी, परांडा), कुंडलिक साखरे, रावसाहेब जाधव आणि विठ्ठल देशमुख यांचा सहभाग होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साखरे यांनी केले, तर आभार श्रीकांत साखरे यांनी मानले.
दोन-तीन रिकाम्या वाड्यांतून सुरू झालेल्या एका छोट्याशा शैक्षणिक प्रयत्नाचे पुढे ज्ञानमंदिरात रूपांतर झाले आणि या ज्ञानमंदिरातून राजुरीच्या असंख्य विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्याची नवी दिशा शोधली. त्यामुळे स्व. सुखदेव साखरे सरांचे कार्य हे केवळ एका शाळेच्या स्थापनेपुरते मर्यादित न राहता ग्रामीण शिक्षणाची जिद्द, शिक्षकांची ताकद आणि समाजघडणीची प्रेरणा देणारा शैक्षणिक इतिहास ठरला आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!