शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कौस्तुभ गावडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा शिक्षक नेते मुकुंद साळुंखे यांचे आवाहन; सोलापूर जिल्ह्यातून मोठे मताधिक्य मिळण्याचा विश्वास
करमाळा : प्रतिनिधी
शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आणि शिक्षकांच्या हक्कांचा आवाज विधान परिषदेत बुलंद करण्यासाठी भाजप माध्यमिक शिक्षक संघ व पीडीएफचे अधिकृत उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या पाठीशी शिक्षकांनी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष मुकुंद साळुंखे यांनी केले. येत्या २३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत कौस्तुभ गावडे यांना पसंतीक्रम क्रमांक एकचे मत देऊन प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असेही त्यांनी सांगितले.
कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारासाठी शिक्षकांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेणे, तसेच प्रत्येक शिक्षकापर्यंत पोहोचण्यासाठी ‘होम टू होम’ प्रचार मोहीम राबविण्यावर भर देण्यात आला आहे. या प्रचारयंत्रणेमुळे सोलापूर जिल्ह्यातूनच विजयाची आघाडी निर्माण होईल आणि कौस्तुभ गावडे यांना मोठे मताधिक्य मिळेल, असा विश्वास साळुंखे यांनी व्यक्त केला.
स्वामी विवेकानंद संस्थेतील शिक्षकांच्या माध्यमातून प्रत्येक शाळेतील शिक्षकांपर्यंत कौस्तुभ गावडे यांचे विचार आणि भूमिका पोहोचविण्यात आल्या आहेत. शिक्षकांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्यासाठी सक्षमपणे काम करणारा प्रतिनिधी विधान परिषदेत असणे आवश्यक आहे. कौस्तुभ गावडे यांची भूमिका शिक्षकांच्या हिताची असून, त्यांच्या नेतृत्वामुळे शिक्षकांच्या विविध प्रश्नांना प्रभावी व्यासपीठ मिळेल, असेही साळुंखे यांनी नमूद केले.
शिक्षकांच्या समस्या, त्यांचे हक्क आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी एकजुटीने मतदान करण्याची गरज असल्याचे सांगत, सर्व शिक्षकांनी कौस्तुभ गावडे यांना पसंतीक्रम क्रमांक एकचे मत देऊन विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मान्यवर उपस्थित
या प्रचारप्रसंगी राज्य संघटनेचे उपाध्यक्ष शिवाजीराव जमाले, माध्यमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष भारत इंगवले, तुकाराम मिटकरी, विजय वाघमोडे, सोलापूर जिल्हा संघटनेचे सचिव संभाजीराव वागज, मकरंद अंकलगी, उत्तमराव हनपुडे, यशवंत तिवारी, सोनवणे, हनुमंत जोडबोटे, अर्चना जमाले, पाटील मॅडम, अर्जुन बनसोडे, शिवाजी लोखंडे, मोहन गायकवाड, हरिदास जाधव, रोहिदास साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.


