नगरपरिषद प्राथमिक शाळेतील प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहन मुख्याध्यापकांच्याच हस्ते व्हावे – प्रियांका गायकवाड, शिवसेना महिला तालुका प्रमुख, करमाळा
करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- करमाळा शहरातील शालेय व्यवस्थापन समितीची दर दोन वर्षांनी समिती गठीत करणे गरजेचे असताना मुदत संपूनही समिती गठीत केली जात नसल्याचा आरोप शिवसेना महिला तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केला आहे. तसेच पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, ज्यांची मुले मराठी शाळेत शिकत आहेत त्यांनाच सदर समितीमध्ये अध्यक्ष वा सदस्य होण्याचा अधिकार असतो परंतु अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांची मुले ही प्राथमिक शिक्षण पूर्ण करून माध्यमिक शिक्षणासाठी दुसऱ्या शाळेत गेलेले असतानाही त्यांची पालक समितीवर अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून नियुक्ती जशाच्या तशा ठेवण्यात आलेल्या असल्याच्या तक्रारी पालकांनी आमच्याकडे केलेल्या आहेत. प्रशासन अधिकारी यांची सोयिस्कररित्या या अनाधिकृत बाबीकडे डोळेझाक होताना पहायला मिळत आहे. त्यामुळे मुख्याधिकारी बालाजी लोंढे व प्रशासन अधिकारी बनसोडे यांना निवेदन दिले असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
पुढे बोलताना गायकवाड म्हणाल्या की, शालेय व्यवस्थापन समिती ही राजकारण विरहीत असणे आवश्यक असताना ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत सर्वच ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, नगरसेवक अशांनी आपली राजकीय शक्तीचा दुरूपयोग करून स्वत:ची निवड समितीवर करून घेतलेली आहे. वास्तविक पाहता प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन या दिवशी मुख्याध्यापक यांनी ध्वजारोहण करणे गरजेचे असताना राजकीय हस्तक्षेपामुळे करमाळा येथील नगरपरिषद प्राथमिक शाळेतील ध्वजारोहण हे बहुतांश राजकारण्याच्या हस्ते होताना पहायला मिळत आहे. त्यामुळे वर्षभर शाळेसाठी, विद्यार्थ्यांसाठी कष्ट करणारे मुख्याध्यापक यांची मनधरणी करावी लागत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. तसेच ध्वजारोहण हे प्रतिष्ठीत नागरिकांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते असे प्रशासनाचे म्हणणे आहे म्हणजे त्या शाळेतील इतर मुलांचे पालक हे पुढाऱ्यांसमोर अप्रतिष्ठीत आहेत का ? असा प्रश्न निर्माण होतो. सर्व सामान्य मुलांचे पालक ही समितीचे अध्यक्ष होणे गरजेचे आहे. त्यामुळे शुक्रवार दि. 26 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाचे व यापुढे येणाऱ्या सर्व ध्वजारोहणाचे अधिकार हे मुख्याध्यापकांना मिळावेत व मुख्याध्यापक यांच्या हस्तेच शाळेतील ध्वजारोहण व्हावे तसेच दि.20 जानेवारी 2024 च्या आत नवीन पालक समिती तयार करावी अशी आग्रही मागणी गायकवाड यांनी केली आहे.
