कुकडी उजनी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षण निधी संदर्भात तरतूद करणेचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश-आमदार संजयमामा शिंदे
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची योजना असलेल्या कुकडी उजनी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणासाठी महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या सिंचन/बिगर सिंचन खात्यातून निधी उपलब्ध व्हावा यासाठी या योजनेचे जनक आ.संजयमामा शिंदे यांचा सन 2022 पासून पाठपुरावा सुरू असून त्यांना अखेर यश आले . काल दि.1 जुलै रोजी या संदर्भातील पत्रावर उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तात्काळ कार्यवाही करण्यात यावी असा शेरा दिला.तर आज दि.2 जुलै रोजी उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी याविषयी जलसंपदा विभागाचे सचिव डॉ. संजय बेलसरे व महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांना निधी उपलब्ध करून देणे संदर्भात निर्देश दिले.यावेळी राजगोपाळ देवरा अप्पर मुख्य सचिव ( नियोजन ),ओ. पी .गुप्ता अप्पर मुख्य सचिव (वित्त ) तसेच जलसंपदा विभागाचे सचिव डॉ. संजय बेलसरे, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, जलसंपदा पुणे (वि.प्र ) चे मुख्य अभियंता हेमंत धुमाळ ,जलसंपदा पुणे विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले यांच्यासह आमदार रामराजे नाईक निंबाळकर ,आमदार बबनदादा शिंदे ,आमदार दीपक चव्हाण ,आमदार संजयमामा शिंदे आदी उपस्थित होते.
नियोजित कुकडी उजनी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणासाठी महामंडळाच्या सिंचन / बिगर सिंचन खात्यातून निधी उपलब्ध व्हावा या संदर्भात आमदार संजयमामा शिंदे यांनी 7 फेब्रुवारी 2022 रोजी तत्कालीन जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील साहेब व व महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांना पत्रव्यवहार केलेला होता.
चौकट –
कुकडी डाव्या कालव्यातून करमाळा तालुक्यासाठी प्रकल्प तरतूदीनुसार पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने उजनी प्रकल्पातून कुकडीचे पाणी उचलण्यासाठी कुकडी उजनी उपसा सिंचन योजना प्रस्तावीत करण्यात आली आहे.सदर योजनेचे लाभक्षेत्र कुकडी प्रकल्पाच्या ३ ऱ्या मंजूर प्रकल्प अहवालाप्रमाणे असून त्यात कोणतीही वाढ किंवा घट नाही. केवळ कुकडी डाव्या कालव्यातून पाणी २५० कि.मी. अंतरावरून वाहून आणण्यात येत असलेल्या अडचणी व पाणी नाश टाळण्यासाठी उजनी धरणातून कुकडीचे करमाळा तालुक्याच्या वाट्याचे पाणी उचलणे प्रस्तावीत आहे. सबब कुकडी प्रकल्प यंत्रणेवरील सिंचन व्यवस्थापनाचा ताण कायमचा कमी होणार असल्याने या योजनेचे सर्वेक्षण तातडीने होणे गरजेचे आहे.
– आ.संजयमामा शिंदे.