सर्वसामान्यांना न्याय देणारे खंबीर नेतृत्व -महेश दादा चिवटे
शिवसेना नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील असणारे शिवसेनेचे विद्यमान सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे हे एक असे नेतृत्व आहे, जे अन्यायविरुद्ध पेटून उठून सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी नेहमी तत्पर असते. परिणामाची चिंता न करता भल्याभल्यांना अंगावर घेऊन सत्याची बाजू धरणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. अन्यायग्रस्ताना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करण्याच्या वृत्तीमुळे महेश चिवटे हे अन्यायग्रस्तांचा आधारस्तंभ ठरू लागले आहेत. म्हणूनच त्यांच्याबाबत बोलताना, “न्यायासाठी लढतो, आवाज उठवतो, अन्यायाविरुद्ध, संघर्ष करतो, देतो धीर, हिंमत आणि साथ, अन्यायग्रस्तांना, देतो तो हात.” असेही म्हटले जावू लागले आहे.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतील बालपण ते एक यशस्वी नेतृत्व, उद्योजक हा त्यांचा प्रवास लक्षवेधक आहे. संघर्षाच्या वाटेवर चालताना ध्येय साधण्यासाठी, कधीही न डगमगता लढत राहणाऱ्या चिवटे यांनी बालपणाच्या काळात पतंग, राख्या आणि वेळप्रसंगी फटाक्याच्या दुकानात काम करून आपल्या जीवनाची सुरुवात केली. खरे तर बालवयात शाळेतही ते हुशार होते. पाचवीत असताना सातारा सैनिक स्कूलमध्ये स्पर्धा परीक्षेतून त्यांचा नंबर लागला होता. मात्र कुटुंबाची जबाबदारी वयाच्या १२ व्या वर्षी खांद्यावर असल्यामुळे त्यांनी सैनिक स्कूलला लागलेले असूनही ते शिक्षण सोडले आणि करमाळ्यातच शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.
हार मानणे नाही, हाच आहे मंत्र, लढत राहणे, हेच आहे तंत्र. याप्रमाणे आचरण ठेवून जिद्द, चिकाटी आणि प्रयत्नांच्या जोरावर जीवनाचा प्रवास करणारे चिवटे लहानपणापासून कोणत्या ना कोणत्या व्यवसायाशी निगडित राहिले असल्यामुळे त्यांना शिक्षणाकडे फारसे लक्ष देता आले नाही. तरीही त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले. पुढे रासायनिक खते, बी-बियाणे आणि कीटकनाशके यांचा व्यवसाय वाढवत असतानाच, वंशपरंपरेने पत्रकारितेचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. स्वातंत्र्यसैनिक तथा पत्रकार आणि करमाळा नगरीचे पहिले नगराध्यक्ष साथी मनोहरपंत चिवटे आणि वडील नरसिंह मनोहरपंत चिवटे यांच्याकडून त्यांना पत्रकारिता व समाजसेवेचा वारसा मिळाला. त्यातूनच त्यांना समाजसेवेची आवड लागली आणि पुढे ते राजकारणातही सक्रिय झाले.
“ध्येय निश्चित ठेव, लक्ष केंद्रित कर, नजर रोखून ठेव, यश तुझेच आहे, मार्ग अनेक येतील, पण तू न थांबता चालत रहा पुढे पुढे , ध्येयप्राप्ती करेपर्यंत” …. याप्रमाणे वाटचाल करुन आपले वक्तृत्व कौशल्य, संघटन कौशल्य आणि उपद्रव्य मूल्य या त्रिसूत्रीच्या जोरावर त्यांनी अनेक पदे भूषविली. मकाई कारखाना संचालक, अर्बन बँक संचालक, शिवसेना प्रसिद्धी प्रमुख, पत्रकार संघ अध्यक्ष अशी पदे भूषवित करत त्यांनी शिवसेनेचे आणि हिंदुत्वाचे विचार तळागाळात पोहोचवण्यासाठी काम केले. सद्यादेखील श्री कमलादेवी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन, शिवसेना जिल्हाप्रमुख पदासह इतरही अनेक पदावर ते कार्यरत आहेत.
माँसाहेब नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी आर्थिक चळवळ उभी केली होती. त्यातून उद्योजक निर्मितीसाठी प्रयत्न केले. त्यांनी अमरनाथ मिल्क प्रोडक्ट्स, बनशंकरी सीड्स, मुक्ताई गारमेंट, महेश ऍग्रो एजन्सी असे उद्योग सुरू केले. त्या माध्यमातून स्वतःची यशोगाथा तयार करतानाच अनेक बेरोजगारांना रोजगाराच्या संधी दिल्या आहेत.
हे सर्व करत असताना त्यांचे धाकटे बंधू मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख म्हणून काम पाहिलेले मंगेश चिवटे यांनीही वयाच्या पंधराव्या वर्षापासून करमाळा सोडून स्वतःचे विश्व निर्माण करत पत्रकारितेत ठसा उमटवला. ते विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाऊ लागले. त्या अनुषंगानेचं महेश चिवटे हे देखील शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार तळागाळात पोहोचवण्याचे काम करू लागले. दरम्यान बंधू मंगेश यांच्या जडणघडणीत महेश चिवटे यांचा वाटा मोठा राहिला आहे.
गेल्या पाच वर्षाच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महेश चिवटे यांना प्रचंड ताकद दिल्याने त्यांनी जवळपास ७० ते ८० कोटी रुपयांचा निधी करमाळा तालुक्यात आणला. सामान्यांचे प्रश्न सोडवू शकतो असा विश्वास निर्माण झाल्यामुळे आज त्यांच्या कार्यालयात रोज शेकडो लोक आपले प्रश्न घेऊन येतात. शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील रुग्णसेवेला गती दिली असून करमाळा येथे मोफत डायलिसिस सेंटर, कमलादेवी ब्लड बँक, मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, गंगुबाई संभाजी शिंदे नर्सिंग कॉलेज अशा वैद्यकीय क्षेत्रातील संस्था उभा करून तालुक्यातील रुग्णांना आधार देण्याचे काम सुरू केले आहे.आजपर्यंत करमाळा तालुक्यात शेकडो आरोग्य शिबिरे घेऊन कोट्यावधी रुपयांची मोफत औषधे वाटण्यात आली आहेत. जवळपास १२,००० लोकांना चष्मे वाटप करण्यात आले असून मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षातून १ कोटी ८० लाख रुपयांची मदत करमाळा तालुक्यातील रुग्णांना देण्यात आली आहे. करमाळ्यातील कोणताही आजारी रुग्ण असेल, तर त्याच्या डोक्यात पहिले नाव येते ते महेश चिवटे यांचे. तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, कृषी खाते अशा विविध खात्याकडील नागरिकांचे सर्व प्रकारचे प्रश्न महेश चिवटे यांच्याकडे येत असून ते सोडविण्यासाठी ते नेहमीच सक्रियपणे योगदान देत आहेत.श्री कमलादेवी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन झाल्यानंतर उद्योगजगतला चालना देऊन मांगी एमआयडीसीचा पंचवीस वर्षांपासून रखडलेला प्रश्न त्यांनी मार्गी लावला. त्या ठिकाणी पाच-पाच गुंठ्याचे ९० भूखंड पाडून वाटप सुरू केले आहे. स्वतः तिथे साडेपाच एकराचा प्लॉट घेऊन कृषी प्रक्रिया प्रकल्प लवकरच सुरू करणार आहेत. यातून जवळपास २०० ते ३०० लोकांना काम मिळेल, तरुणांना रोजगार मिळणार आहे.
हे सर्व करत असताना अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची त्यांची क्षमता ही वाखाणण्याजोगी आहे. करमाळा तालुक्यातील बंडखोर नेतृत्व म्हणून ओळखले जाणार, कामगार नेते कै. सुभाष आण्णा सावंत यांच्या तालमीत राजकारणाचे धडे त्यांनी घेतले आहेत. उपद्रव मूल्याचा वापर करून सत्ताधाऱ्यांवर, प्रशासकीय अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवण्याची त्यांची ताकद सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी उपयोगी पडत आहे.आज एक निर्भीड नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे संपूर्ण तालुक्यातील जनता पाहत असून त्यांच्या माध्यमातून आगामी काळात अशीच तालुक्याची जनतेची सेवा घडावी, विशेषता ज्याच्यावर अन्याय होतो त्याला न्याय देण्याची ताकद आई कमलाभवानी देवी त्यांना देवो, हीच त्यांच्या सात मार्च रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!
“तुमच्यातील उत्साह सदैव टिकून राहो,
नवीन ध्येये गाठण्याची शक्ती मिळो,
वाढदिवसाच्या या शुभदिनी,
तुमच्या सर्व स्वप्नांना पूर्णता येवो.”
