पुणे जिल्ह्यातील स्थगिती दिलेल्या ३०३ कोटींच्या कामांना पालकमंत्री चंद्रकांतदादांनी पडताळून दिली मंजुरी!*
पुणे : उच्च तंत्र शिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कलेक्टर जिल्हा नियोजन सचिवांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना माहिती देताना म्हटले कि , सरकार आल्यांनतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी याआधी नियोजनामध्ये जी जी कामे दिली त्या सगळ्यांना स्टे दिला होता. पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी प्रत्येक काम चेक केलं पाहिजे असे म्हटले होते. त्यामुळे मी प्रत्येक काम चेक करून ३०३ कोटींच्या कामांना मी मंजुरी दिली आहे. यामध्ये विरोधी आमदारांना सुद्धा त्यांचं सरकार असताना जी कामं मिळाली होती त्यात एक रुपयाचं काम कमी न करता मी सगळी काम सुरु केली आहेत, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले कि, अजित पवार यांनी त्यांच्या इतर आमदारांना १० कोटी, १३ कोटी देऊन स्वतःला मात्र ८० कोटी घेतले होते. दिलीप वळसे पाटील यांनी स्वतःकडे ४० कोटी घेतले होते. भरणे यांनी ४० कोटी घेतले होते. त्या सगळ्याचे मी निम्मे निम्मे ठेवले आणि मी त्यांना आश्वस्त केले कि, हे सगळे मी सुरक्षित ठेवतो आणि वर्षाच्या शेवटी कुठे काय शिल्लक आहे तसे आवश्यकता बघून त्याप्रमाणे वाटप करतो, त्यावेळी हि कामे पूर्ण करेन असे हि चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
सरकार आता शिवसेना – भाजपचे आल्यामुळे जे तुम्ही विकासकामं शून्य रुपये असं केलं होतं तसं मला करून चालणार नाही, असा टोला महाविकास आघाडी सरकारला चंद्रकांत पाटील यांनी लगावला . शिवसेना – भाजप सरकारलाही मला विकासकामासाठी निधी द्यायला लागेल. असा विकासकामांचा निधी भाजप आणि शिवसनेच्या नेत्यांनासह विरोधी आमदारांना देण्यासहीत काल पहिला टप्पा ३०३ कोटींचा घोषित केला असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
