कोर्टी पंचायत समिती गणामधून संधी मिळाल्यास निवडणूक लढवणार – जालिंदरशेठ बापू पानसरे*

करमाळा प्रतिनिधी
कोर्टी पंचायत समिती गणामधून संधी मिळाल्यास सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी आपण निवडणूक लढवणार असल्याचे मत कुंभारगाव येथील उद्योजक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती जालिंदर बापू पानसरे यांनी व्यक्त केले आहे.
जालिंदर बापू पानसरे हे माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे कट्टर समर्थक असून आमदार नारायण आबा पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. यशस्वी उद्योजक आणि कुशल नेतृत्व म्हणून त्यांनी करमाळा तालुक्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पानसरे यांनी घरच्या परिस्थितीमुळे मुंबई येथे जाऊन ट्रान्सपोर्ट व्यवसायात कर्मचारी म्हणून सुरुवात केली. जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी स्वतःचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय यशस्वीपणे उभारला.
व्यवसाय करत असतानाच त्यांनी आपल्या मूळ गावी समाजकारणातून राजकारणात प्रवेश केला. माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला व कुंभारगावच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले.
धार्मिक व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या पानसरे यांनी हरिनाम सप्ताह, भजन आदी उपक्रमांतून जनसंपर्क वाढवला. जनतेच्या आग्रहामुळे त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढवून उपसभापतीपद भूषवले. या काळात शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रभावी भूमिका बजावली.
गरजू, गोरगरीब नागरिकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेले पानसरे बापु पोलीस स्टेशन, पंचायत समिती, जिल्हा परिषद आदी ठिकाणी स्वतः लक्ष घालून कामे करून घेतात. त्यामुळे ‘बापू म्हणजे आपला माणूस’ अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
महादेवाचे निस्सीम भक्त असलेले जालिंदरशेठ बापू पानसरे राजकारणासोबत समाजकारण व आधुनिक शेती यांचा समतोल साधत आहेत. त्यांच्या यशस्वी वाटचालीत पत्नी सौ. नंदाताई पानसरे यांचा मोलाचा वाटा असून त्या विकास सहकारी संस्थेच्या चेअरमन आहेत.निष्काम भावनेने सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारे जालिंदरशेठ बापू पानसरे हे आजच्या पिढीतील सज्जन व लोकाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जात आहेत. कोर्टी गणाचा विकास करण्यासाठी ते निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.


