करमाळा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केत्तूर-२ येथे शाळा व्यवस्थापन समितीची निवड; १ लाख ८१ हजार रुपयांचा शाळा विकास निधी जमा

.
 करमाळा प्रतिनिधी जि. प. प्राथमिक शाळा केत्तूर-२ येथे शाळा विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारी शाळा व्यवस्थापन समितीची निवड नुकतीच एकमताने पार पडली. या निवडीत अध्यक्षपदी शामल अमोल खाटमोडे तर उपाध्यक्षपदी पूजा जोतीराम ढवळे यांची निवड करण्यात आली. नव्याने निवड झालेल्या समितीकडून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक भूमिका घेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
निवडीनंतर अध्यक्ष शामल खाटमोडे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या खेळ व शैक्षणिक सुविधांच्या विकासासाठी प्लेवर ब्लॉक्स बसविण्यासाठी ७५ हजार रुपये, तर उपाध्यक्ष पूजा ढवळे यांनी ३१ हजार रुपये अशी भरघोस आर्थिक मदत शाळेस दिली. या मदतीमुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकासास चालना मिळणार आहे.
शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी निशा नवले, चैत्राली जरांडे, माया धुमाळ, मदीना शेख, रूपाली महामुनी, सुहास जाधव, योगेश कनिचे, महेश येवले, योगेश देवकते, संदीप बाबर, नारायण ननवरे तसेच सचिन निंभोरे (शिक्षणतज्ज्ञ) यांची निवड करण्यात आली. याशिवाय कमल पवार (ग्रामपंचायत सदस्य) यांचीही समितीवर निवड झाली.
शाळेच्या विकासासाठी सर्व सदस्यांनी सामाजिक बांधिलकी जपत प्रत्येकी ५ हजार रुपये योगदान दिले. तसेच ग्रामपंचायत सदस्या कमल पवार यांनी १५ हजार रुपये आर्थिक मदत दिली. यामधून एकूण १ लाख ८१ हजार रुपयांचा शाळा विकास निधी जमा झाला असून हा निधी शाळेच्या भौतिक सुविधा, शैक्षणिक साहित्य व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वृद्धीसाठी वापरण्यात येणार आहे.
निवड झालेल्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचा सन्मान सचिव तथा मुख्याध्यापक वनिता पानसरे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी समितीच्या सहकार्यामुळे शाळेच्या शैक्षणिक व भौतिक प्रगतीला अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमावेळी उपस्थित पालकांनी शाळेतील स्वच्छता, भौतिक सुविधा, शिक्षकांचे अध्यापन व विद्यार्थ्यांची गुणवत्ता याबाबत समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमास येडे सर, शितोळे सर, निकत सर, निकम मॅडम यांच्यासह बहुसंख्य पालक उपस्थित होते.
ही निवड व मिळालेला विकास निधी जि. प. प्राथमिक शाळा केत्तूर-२ च्या उज्ज्वल शैक्षणिक भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!