वाशिंबे गावात सौर ऊर्जा प्रकल्पाविरुद्ध ग्रामस्थ सज्ज; “रस्ता रोको आंदोलन”चा काँग्रेसचे नेते आनंद झोळ यांचा इशारा
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील वाशिंबे गावातील ग्रामस्थ व स्थानिक काँग्रेस नेते आनंद भैय्या झोळ यांनी वाशिंबे येथील सौर ऊर्जा प्रकल्पाविरुद्ध आपला ठाम विरोध व्यक्त केला आहे. झोळ यांच्या माहितीनुसार, प्रकल्पासाठी गावातील श्री भैरवनाथ मंदिराकडे जाणारा रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केला गेला तर ग्रामस्थ “रस्ता रोको आंदोलन” उभारण्यास तयार आहेत.
हा रस्ता गेल्या 50-60 वर्षांपासून धार्मिक आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरला आहे. रस्त्याचा वापर गावकऱ्यांकडून मंदिरात जाण्यासाठी तसेच विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांसाठी केला जातो. त्यामुळे रस्ता बंद झाल्यास गावकऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर तसेच धार्मिक विधींवर थेट परिणाम होऊ शकतो, असे स्थानिकांनी सांगितले.
आनंद भैय्या झोळ यांनी स्पष्ट केले की, “हा रस्ता फक्त धार्मिक नाही, तर गावकऱ्यांच्या दैनंदिन जीवनासाठी अत्यंत महत्वाचा आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीपूर्वी स्थानिकांचा विचार केला जावा. आपल्या परंपरा आणि गावाच्या हितासाठी आम्ही प्रत्येक प्रकारच्या आंदोलनासाठी सज्ज आहोत.”
सध्या या प्रकल्पाची अंमलबजावणी आणि रस्त्याबाबत प्रशासन किंवा कंपनीकडून कोणतेही अधिकृत निर्णय आलेले नाहीत. तज्ज्ञांच्या मते, ग्रामस्थांचा निर्धार प्रशासनावर दबाव निर्माण करतो आणि प्रकल्प अंमलबजावणीपूर्वी स्थानिक समुदायाशी संवाद साधणे आवश्यक ठरेल.
गावकऱ्यांचा हा निर्धार हे दर्शवतो की, परंपरा आणि विकास यांच्यात संतुलन राखण्याची आवश्यकता आहे. स्थानिक प्रशासनाने वेळेत योग्य तो न निर्णय घेतल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष आनंद झोळ यांनी दिला आहे.


